दरमहा १ लाख व इतर इन्सेंटिव्ह असे वार्षिक १५ लाखांचे पॅकेज; आमिष दाखवून तरूणीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:20 IST2025-07-23T10:20:34+5:302025-07-23T10:20:59+5:30
तरुणीने बोलणे टाळल्यानंतर तो मेसेज करून अश्लील फोटो पाठवत असे, तसेच फोटो प्रमाणे काम करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवत असे

दरमहा १ लाख व इतर इन्सेंटिव्ह असे वार्षिक १५ लाखांचे पॅकेज; आमिष दाखवून तरूणीची फसवणूक
पुणे : कंपनीमध्ये दरमहा १ लाख रुपये व इतर इन्सेंटिव्ह असे वार्षिक १५ लाखाचे पॅकेज देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला खोटे जॉब लेटर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
शंतनु अनिल सदाशिव (रा. यवतमाळ) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शंतनुने फिर्यादीला कंपनीमध्ये दरमहा १ लाख रुपये व इतर इन्सेंटिव्ह असे वार्षिक १५ लाखाचे पॅकेज देण्याचे आमिष दाखवून जानेवारी महिन्यात खोटे जॉब लेटर दिले. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन केले. फिर्यादी तरुणीने बोलणे टाळल्यानंतर तो मेसेज करून अश्लील फोटो पाठवत असे. तसेच फोटो प्रमाणे काम करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवत असे. फिर्यादीने याला विरोध केल्यानंतर तो वारंवार तिचा पाठलाग करून पोलिस तक्रार करण्याची धमकी देत असे. या त्रासाला कंटाळून तरुणीने त्याच्या विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) नवले करीत आहेत.