Pune Crime: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अत्याचार; आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 09:45 IST2023-07-07T09:45:01+5:302023-07-07T09:45:31+5:30
पीडितेने डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती...

Pune Crime: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अत्याचार; आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी
पुणे : अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यासमवेत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचा गर्भपात करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
हर्षदीप सिंग किशन सिंग सिद्धू (रा. एरंडवणे प्रभात रस्ता) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेने डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. ही घटना २०१२ ते २०१५ दरम्यान घडली. त्यावेळी पीडिता ही अल्पवयीन होती. आरोपीने फेब्रुवारी २०१२ मध्ये अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी ओळख वाढवून तिचा मोबाइल क्रमांक मिळविला. तिच्याशी फोनवरून संपर्क साधून प्रेमाचे नाटक केले. मे २०१२ मध्ये त्याच्या घरी बोलावून कोकाकोलामध्ये गुंगीचे औषध पाजले.
बेशुद्धावस्थेत संमतीशिवाय मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. डिसेंबर २०१५ दरम्यान वेळोवेळी मुलीशी संबंध ठेवले. त्यात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. नंतर पौड रस्त्यावरील एका रुग्णालयात तिला गर्भपात करण्यास लावले, असे पीडितेने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या तक्रारीवरून डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. ससून आणि खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांचा पुरावा महत्त्वाचा ठरला. डेक्कन पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एस. यू. तांबे यानी या प्रकरणाचा तपास केला.