शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:05 IST2025-11-18T14:05:11+5:302025-11-18T14:05:55+5:30
गोरख शेळकंदे हे शेताच्या बाजूला लघुशंकेश गेले असताना अचानकपणे बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला

शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ
ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळील डोमेवाडी परिसरात मंगळवार दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास दहा वाजता बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमनाथ मंदिरामागील शेतकरी ज्ञानेश्वर ढोमसे यांच्या शेतात मजुरीसाठी आलेले गोरख पुनाजी शेळकंदे (वय २९, रा. वालहिवरे) हे सकाळच्या सुमारास आपल्या कामादरम्यान शेताच्या कडेला लघुशंकेसाठी गेले असता ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरख शेळकंदे हे शेताच्या बाजूला लघुशंकेश गेले असताना अचानकपणे बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला. अनपेक्षितरीत्या झालेल्या या प्रसंगाने शेळके काही क्षणांनी सावरले आणि मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केला. आरडाओरड ऐकताच शेतातील इतर मजूर व स्थानिक नागरिक तत्काळ त्या दिशेने धावले. मानवी हालचाली व गोंधळ पाहून बिबट्याने तेथून पळ काढला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने जखमी गोरख शेळके यांना बाहेर काढून ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले असून सुदैवाने गंभीर दुखापत टळली असल्याची माहिती मिळते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने त्या परिसराला तत्काळ भेट देऊन पाहणी केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या भागात वन्यप्राण्यांची हालचाल वाढलेली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तसेच, बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगितले.