भिगवण : पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ (ता. इंदापूर) येथील पुलाला भगदाड पडले असून पुलाच्या लगतचा काही भाग कोसळला आहे यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे तरी देखील पुलावरून बंद असलेली अवजड धोकादायक वाहतूक सुरूच आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने पाण्याच्या लाटा पुलांच्या भिंतींना धडकत असल्याने पुलाचा भाग निखळून पडत असल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे.
डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता. कालांतराने नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर हा मार्ग रस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ब्रिटिशांनी डिकसळ येथे भीमा नदीवर पूल उभारलेला आजही नागरिकांना दळणवळणासाठी वरदान ठरत आहे. परंतु सध्या या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कमानी उभारून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी देखील या पुलावरून अवजड वाहतूक सुरु असल्याने मोठा धोका निर्माण झाला असून पूल कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती ऍग्रो, अंबालिका, दौंड शुगर , इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. या पुलावरून जड वाहतूक होत असल्याने हा पूल मागे काही वर्षांपूर्वीही जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या भागातील जड वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. म्हणून काही राजकीय मंडळींनी यात मध्यस्थी करून पुन्हा चालू केला होता. आता तो पुन्हा बंद करण्यात आला आहे.
दोन जिल्हाच्या संर्पक तुटणार?
पुणे आणि सोलापूर जिल्हातील ३० ते ३५ गावांसाठी वरदान असलेला हा पूल दळणवळणासाठी महत्वाचा आहे. हा पूल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तुटणार असून दळणवळ करण्यासाठी ५० किलोमीटरचा वळसा घालून गावांकडे जावे लागणार आहे. करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली, खातगाव, जिंती, पारेवाडी केतूर, कात्रज, पोमलवाडी, रामवाडी या गावांमधील नागरिक विद्यार्थी दररोज शैक्षणिक तसेच अन्य कामांसाठी भिगवणला ये-जा करत असतात. या पुलाचा संर्पक तुटल्यास मोठे नुकसान होणार आहे.
पुलाचे काम रखडले
करमाळा तालुक्याचे तत्कालीन आमदार संजय शिंदे यांनी विधानसभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ५५ कोटींचा निधी मंजूर केला होता. निधी कमी पडत असल्याने वाढीव निधी देवून पुलाचे काम २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. उजनीच्या पाणी पातळीत पाण्याची वाढ झाल्याने पुलाच्या कामास अडथळा येत असल्याने काम पुन्हा पाणी कमी झाल्यानंतर २०२५ मध्ये सुरु करण्यात मात्र काम संथगतीने सुरू होते. पाणी वाढल्याने पुन्हा बंद झाले पुलाचे काम आधुनिक पद्धतीने करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.