वैचारिक मतभेदामुळे सव्वा वर्षापासून वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 20:33 IST2025-08-12T20:33:09+5:302025-08-12T20:33:43+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार, परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी जर दोघे प्रदीर्घ कालावधीपर्यंत वेगळे राहत असतील

वैचारिक मतभेदामुळे सव्वा वर्षापासून वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट
पुणे : ती गृहिणी, तर तो व्यावसायिक. विवाहानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि वैचारिक मतभेदांमुळे लग्नानंतर दीड महिन्यातच ते वेगळे राहू लागले. भविष्यात त्यांचे एकत्र येणे शक्य नव्हते. अशा या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट पहिल्या तारखेला झाला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी हा निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार, परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी जर दोघे प्रदीर्घ कालावधीपर्यंत वेगळे राहत असतील, तर सहा महिन्यांचा वेगळे राहण्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सव्वा वर्षापासून वेगळे राहत होते. त्यामुळे अर्जदारांच्या वकिलांनी हा कालावधी वगळण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
राकेश (वय ३४) आणि स्मिता (वय २९) (नावे बदलली आहेत) असे या दोघांची नावे आहेत. त्यांनी ॲड. अमर गुजर आणि ॲड. सुचित मुंदडा यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोघांचे लग्न एप्रिल २०२४ मध्ये झाले, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्यामध्ये वाद सुरू झाले. वाद इतके प्रखर झाले की २ जून २०२४ पासून दोघे वेगळे राहू लागले.
कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी ठरले नाही. त्यामुळे घटस्फोटाचाच निर्णय झाला. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज केला होता आणि तो मंजूर झाला. निकालानुसार राकेशने स्मिताला एकरकमी पोटगी दिली. मात्र, स्त्रीधन, इतर दागिने, पैसे आणि संसारोपयोगी साहित्य यावरून कोणताही वाद नव्हता.
वैचारिक मतभेदांमुळे दोघे सव्वा वर्षापासून वेगळे राहत होते आणि ते एकत्र येणे शक्य नव्हते. दोघे परस्पर संमतीने घटस्फोटासाठी तयार असल्याने त्यांना आणखी सहा महिने थांबवणे उचित नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली असून, आता दोघे स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत. - ॲड. सुचित मुंदडा, अर्जदारांचे वकील