बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला…
By नारायण बडगुजर | Updated: May 8, 2025 18:10 IST2025-05-08T18:09:35+5:302025-05-08T18:10:30+5:30
बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील महाविद्यालयात गेली. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते.

बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला…
पिंपरी : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे मी आता नदीवर आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचा फोन मुलीने आईला केला. रिझल्ट पाहण्यासाठी गेलेल्या मुलीचा अशा प्रकारे फोन आल्यामुळे आई हादरली. आईने मुलीला थेट पिंपरी पोलीस ठाण्यात आणले. पिंपरीतील मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तरुणीचे मन परिवर्तन केले आणि तिचा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाकला.
बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील महाविद्यालयात गेली. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येचा विचार केला. वडील नाहीत, बहीण आणि आई नोकरी करून आपला सांभाळ करत आहेत. त्यातच कमी गुण मिळाले म्हणून तरुणी रडत होती. आपली मैत्रीण रडत असल्याचे पाहून अन्य एका मुलीने तरुणीच्या आईला फोन केला.
मी आता नदीवर आत्महत्या करायला जात आहे, असे तरुणीने तिच्या आईला फोनवरून सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिने मुलीला शोधले. मी आता घरी येणार नाही, असे तरुणी म्हणत होती. त्यामुळे तिच्या आईने मुलीला थेट पिंपरी पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंह चौधरी आणि उपाध्यक्षा नेहा रोकडे यांना मिळाली. अध्यक्ष चौधरी, उपाध्यक्ष रोकडे, सचिव रजिया शेख, विशाल वाली यांच्यासह संस्थेची समुपदेशन टीम पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाली.
संस्थेच्या तज्ज्ञ समुपदेशकांनी तरुणीशी संवाद साधला. तिच्या मनातील भावनिक अस्वस्थतेचे मूळ समजून घेतले आणि तिला मानसिक आधार दिला. शिक्षणात अपयश म्हणजे आयुष्य अपयशी झाले असा समज चुकीचा आहे, हे तिला समजावून सांगितले. तिच्या आयुष्यात अनेक सकारात्मक संधी आहेत, हे भान देण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या संवादातून ती नैराश्यातून बाहेर आली. तिला आत्मभान येऊ लागले. त्यानंतर आत्महत्येचा विचार सोडून ती आईसोबत सुखरूप घरी परतली. या घटनेमुळे केवळ एक जीव वाचवला गेला नाही, तर एका कुटुंबाचा उद्विग्न क्षणही टळला.
पिंपरी पोलिस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय घाडगे आणि पोलिस उपनिरीक्षक अनुजा राऊत यांनी संस्थेला या उपक्रमात सहकार्य केले. त्यांनी वेळेवर कृती करत तरुणीला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या. पोलिसांनी संस्थेच्या तत्परतेचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्याची ग्वाही दिली.
तरुणाई आपल्या देशाची ताकद आहे. त्यांना मानसिक आरोग्याच्या बाबतीत आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. शिक्षणात अपयश आले तरी ते अंतिम नाही, हा संदेश आपण सातत्याने देत राहायला हवा. - धनराजसिंह चौधरी, अध्यक्ष, मानवता हिताय सोशल फाउंडेशन