पुण्यात दहीहंडीच्या वेळी झालेल्या वादातून सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 15:23 IST2022-08-20T15:20:28+5:302022-08-20T15:23:57+5:30
एक जण गंभीर जखमी....

पुण्यात दहीहंडीच्या वेळी झालेल्या वादातून सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार
पुणे/धायरी: दहीहंडीच्या उत्सवात नाचत असताना सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर वार केले. एका सराईताने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वडगाव परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
ओंकार लोहकरे असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तुकाईनगर परिसरातील कॅनॉल शेजारील रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
महादेव नगर येथील वेताळ मित्र मंडळ दहीहंडी उत्सवात शुभम जयराज मोरे (रा.महादेव नगर, वडगाव) हा त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. यावेळी आरोपी चेतन ढेबे, ओंकार लोहकरे, अनुराग चांदणे, ज्ञानेश्वर जाधव, बाला ढेबे, साहिल उघडे, वैभव साबळे व त्यांचे सात ते आठ मित्र यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोरे याला मारहाण केली. यावेळी आरोपी लोहकरे याने हवेत गोळीबार केला. चेतन ढेबे याने मोरे याच्या मानेवर वार करून त्याला जखमी केले. आरोपी बाला ढेबे याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली.