जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाची जोड; शेतकऱ्याची कन्या पंचवीसाव्या वर्षी न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:25 IST2025-04-02T12:24:40+5:302025-04-02T12:25:23+5:30

आई - वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले

A combination of determination perseverance and hard work Farmer daughter becomes a judge at the age of twenty-five | जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाची जोड; शेतकऱ्याची कन्या पंचवीसाव्या वर्षी न्यायाधीश

जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाची जोड; शेतकऱ्याची कन्या पंचवीसाव्या वर्षी न्यायाधीश

आळंदी: जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची जोड असल्यास कोणत्याही परिस्थितीत सर्वकाही शक्य आहे, असे म्हटले जाते. त्याचीच प्रचिती आली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये ग्रामीण भागातील तुळापूरसारख्या छोट्याशा गावातील एका शेतकरी कन्येने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रतीक्षा पांडुरंग बोत्रे असे तिचे नाव असून, कमी वयात तिने न्यायाधीश पदाला गवसणी घालण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. गाव तसेच परिसरातून प्रतीक्षा बोत्रे ही पहिली न्यायाधीश बनली आहे.

प्रतीक्षाने तुळापूर येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अकरावी व बारावीचे शिक्षण वाघोलीतील भारतीय जैन संघटनेच्या महाविद्यालयात घेतले. त्यानंतर पुणे येथून कायद्याची बीए एलएलबी ही पदवी घेतली. सन २०२२मध्ये न्यायाधीश पदासाठी आलेल्या एमपीएससीच्या जाहिरातीवरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. विशेषतः पहिल्याच प्रयत्नात न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण केली. प्रतीक्षाला २५० गुणांच्या परीक्षेत एकूण १५० गुण मिळाले, तर मुलाखतीमध्ये ३४ गुण मिळाले आहेत. राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त ११४ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. प्रतीक्षाचे आई - वडील शेती व जोडव्यवसाय करतात. या यशानंतर परिवारासह प्रतीक्षाला आनंदाश्रू अनावर झाले. आई - वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया प्रतीक्षाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, मुंबईत प्रशिक्षण झाल्यानंतर तालुकास्तरावर न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल. प्रतीक्षाच्या या यशाबद्दल गावातील ग्रामस्थांसह नातेवाइकांनी तिचा सत्कार केला.

Web Title: A combination of determination perseverance and hard work Farmer daughter becomes a judge at the age of twenty-five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.