शिरवळ - शिरवळजवळील शिंदेवाडी-भोर रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. मृतांमध्ये बारामती तालुक्यातील होळ-साळोबावस्ती येथील नजीर जावेद पठाण (वय १८) आणि गडचिरोली जिल्ह्यातील सचिन बळीराम मडावी (वय २२, रा. कुरडी) यांचा समावेश आहे. तसेच,विश्वजित विठ्ठल खोमणे (वय १९, रा. मुरूम, ता. बारामती), वैभव नितीन भिसे (वय १९, रा. होळ, ता. बारामती) आणि अमोल नामदेव लिगसे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, जालना) हे तिघे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम-होळ येथील तिन्ही युवक शिरवळ-शिंदेवाडी फाटा येथून लोणंदच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना तातडीने शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नजीर पठाण हा सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या दुर्दैवी निधनाने होळ-मुरूम गावात शोककळा पसरली आहे.
शिरवळ येथे दुचाकी अपघात; बारामतीच्या तरुणासह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:47 IST