मंचरमध्ये घराजवळ खेळत असलेला चिमुरडा वाहनाच्या धडकेत ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 18:12 IST2022-09-07T18:10:10+5:302022-09-07T18:12:15+5:30
राहत्या घराजवळ झाला अपघात...

मंचरमध्ये घराजवळ खेळत असलेला चिमुरडा वाहनाच्या धडकेत ठार
मंचर : रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. श्री रामकृष्ण शिंदे (रा. श्रीरामनगर पेठ) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. हा अपघात शिंदे यांच्या राहत्या घराजवळ घडला आहे. रामकृष्ण मधुकर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
शिंदे हे श्रीरामनगर पेठ येथे कुटुंबासह राहतात. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा दोन वर्षांचा मुलगा श्री हा राहत्या घराच्या बाजूने पेठ गावातून सणसवस्ती कारेगाव बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला खेळत होता. रामकृष्ण शिंदे हे पत्नी, आई, चुलते व शेजाऱ्याबरोबर घराच्या जवळ बोलत उभे होते. त्यावेळी पेठ बाजूकडून सणसवस्ती कारेगाव बाजूकडे निघालेल्या सौरभ कोंडाजी सणस हे चालवत असलेल्या मोटारीने श्री यास धडक दिली.
श्री याच्यावर सुरुवातीला राजगुरुनगर येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामकृष्ण मधुकर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सौरभ कोंडाजी सणस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.