‘मला शक्ती भाई म्हणतात’ दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: January 17, 2024 18:13 IST2024-01-17T18:13:27+5:302024-01-17T18:13:35+5:30
पत्नीला मारहाण करताना बाहेरील नागरिकांनी मध्यस्थी केली असता लोकांना लाकडी दांडके मारून गुन्हेगाराने परिसरात दहशत निर्माण केली

‘मला शक्ती भाई म्हणतात’ दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल
पुणे: पत्नीला मारहाण करत असल्याने शेजारी राहाणाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सराईत गुन्हेगाराने अश्लील शिवीगाळ करुन ‘मी एकएकांना बघुन घेतो, शक्ती भाई म्हणतात मला’ असे म्हणत लोकांना लाकडी दांडके मारून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. १६) मंगळवार पेठेत घडला आहे. याबाबत कुमार मोहन देसाई (३४, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सुरज मोहन देसाई (२५, रा. मंगळवार पेठ) याच्यावर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज हा फिर्यादी कुमार यांच्या घरा शेजारी राहतो. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपी सुरज हा त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. त्यांची भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी व त्यांची सासू गेले असता सुरजने कुमार यांना अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला अडवले असता आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात गाडीची चावी मारुन जखमी केले.
सुरज याने भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांना मारण्याचा उद्देशाने त्याठिकाणी पडलेला लाकडी दांडका हातात घेऊन लोकांच्या अंगावर धावून गेला. तसेच दांडका फेकून मारला. यामुळे लोकांची पळापळ झाली. तेव्हा आरोपीने लाकडी दांडका हातात घेऊन तो हवेत फिरवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच ‘मी एकएकांना बघुन घोते, शक्ती भाई म्हणतात मला’ असे म्हणून परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत.