पीएमपी अपघाताला ब्रेक..! जानेवारी महिन्यात एकही अपघात नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:58 IST2025-02-14T12:56:56+5:302025-02-14T12:58:07+5:30
सीआयआरटीकडून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचा फायदा झाला

पीएमपी अपघाताला ब्रेक..! जानेवारी महिन्यात एकही अपघात नाही
पुणे : वाढत्या अपघातांमुळे मागील काही महिन्यांपासून पीएमपीवर टीकेचा भडिमार हाेत हाेता. त्याची गंभीर दखल घेत पीएमपी प्रशासन स्व-मालकीच्या चालकांसह ठेकेदारांच्या सर्व चालकांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. केंद्रीय सडक परिवहन संस्था (सीआयआरटी) येथे जानेवारी महिन्यापासून हे प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत ८५० चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, पहिल्यांदाच संपूर्ण महिन्यांत ‘पीएमपी’चा एकही अपघात झाला नाही, ही सुखद बाब घडली आहे.
पीएमपीच्या चालकांकडून होणाऱ्या चुकांमुळे दैनंदिन ३ ते ४ अपघात होत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांपासून चालकांपर्यंत नागरिकांकडून सतत टीका हाेत होती. त्यामुळे पीएमपीच्या वतीने सर्व चालकांना रस्ते वाहतुकीचे नियम व कायदे, प्रवाशांची सुरक्षितता, बसमधील तांत्रिक बाबी यांसह अन्य मुद्द्यांवर प्रशिक्षण देण्याचे ठरविले होते. त्यानुसार सीआयआरटीकडून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचा फायदा झाला असून, अपघाताला ब्रेक लागला आहे.
५० चालकांची बॅच
पीएमपीकडे स्वमालकीचे आणि ठेकेदार असे एकूण जवळपास तीन हजार चालक आहेत. या सर्व चालकांना टप्प्याटप्प्याने (५० ची एक बॅच) प्रशिक्षण सुरू आहे. त्यामध्ये बसचालकाची मानसिक स्थिती यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कसे वागावे, कसे बोलावे, कसे राहावे, यासह रस्ते वाहतुकीचे नियम काय, त्याचे कायदे काय, सीएनजी बस, इलेक्ट्रिक बस कशी चालवावी, कशी हाताळावी यासह अन्य आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
अशी आहे आकडेवारी
पीएमपीचे एकूण चालक - ३ हजार
प्रशिक्षण पूर्ण - ८५०
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व चालकांना ‘सीआयआरटी’तर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचा फायदा झाला असून, जानेवारी महिन्यात पीएमपीचा एकही अपघात झाला नाही. - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी