Pune: ‘मॅट्रिमोनियल साइटवर’ झालेली मैत्री पडली दहा लाखांना, महिलेची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 10:30 IST2023-11-06T10:29:43+5:302023-11-06T10:30:55+5:30

याबाबत केशवनगर परिसरातील एका ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.....

A 60-year-old woman was cheated of a million on 'matrimonial site' friendship | Pune: ‘मॅट्रिमोनियल साइटवर’ झालेली मैत्री पडली दहा लाखांना, महिलेची फसवणूक

Pune: ‘मॅट्रिमोनियल साइटवर’ झालेली मैत्री पडली दहा लाखांना, महिलेची फसवणूक

पुणे : मॅट्रिमोनी साइटवरून मैत्री करून डॉलर तसेच ते धुण्यासाठी ॲसिड पाठवतो असे सांगून निवृत्त बँक मॅनेजर महिलेला एकूण ९ लाख ९३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत केशवनगर परिसरातील एका ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मॅट्रिमोनियल साइटवरून थॉमस मॅथ्यू याच्याशी मैत्री झाली. कार्निव्हल क्रूजसाठी मी काम करतो आणि घटस्फोटित असून मला दोन मुलं आहेत, असे त्याने फिर्यादींना सांगितले. क्रूजवर काम करत असल्याने फोनवर बोलू शकत नाही, असे सांगितल्याने ईमेलवरून त्यांच्यात संभाषण सुरू झाले.

दरम्यान, जहाजावर समुद्रीचाच्यांचा हल्ला होणार आहे. त्यामुळे माझ्याकडे असलेले १ लाख २९ हजार डॉलर मी तुझ्याकडे पाठवतो, असे सांगितले. फिर्यादींनी होकार देऊन घरचा पत्ता दिला. त्यानंतर डॉलर पाठवण्यासाठी व्हिसा चार्जेस, कुरिअर पॅकेज, डिपॉझिट रक्कम, फाईन तसेच डॉलर धुण्यासाठी ॲसिड अशी अनेक कारणे सांगून फिर्यादी महिलेकडून एकूण ९ लाख ९३ हजार रुपये उकळले. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे.

Web Title: A 60-year-old woman was cheated of a million on 'matrimonial site' friendship