पुण्यात ‘पीएमपी’ बसमध्ये २३ वर्षीय तरुणीला अश्लील स्पर्श, व्हिडिओही दाखवला
By नितीश गोवंडे | Updated: May 4, 2024 15:18 IST2024-05-04T15:17:41+5:302024-05-04T15:18:54+5:30
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

पुण्यात ‘पीएमपी’ बसमध्ये २३ वर्षीय तरुणीला अश्लील स्पर्श, व्हिडिओही दाखवला
पुणे : पीएमपीमधून प्रवास करताना चोऱ्यांसह महिला-मुलींचा विनयभंग होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पीएमपी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत. अशाच एका प्रकरणात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला अश्लील स्पर्श करुन, तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास घडला. पोलिसांनी गुलाम हुशेन महम्मद इदरीस (२७, रा. हरीहरपूर, ता. तुलसीकूर, जि. बलरामपुर, उत्तर प्रदेश, सध्या रा. वारजे माळवाडी फुटपाथवर) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीएमपीमधील सीसीटीव्ही सुरू आहेत का?
पीएमपी प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने, मोबाइल व अन्य मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विनयभंग सारखे प्रकार देखील अनेकदा घडले आहेत. असे असताना, पीएमपी मध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शो साठी लावले आहेत, की ते सुरू देखील आहेत असा प्रश्न प्रवाशांना पडतो. जेव्हा अशाप्रकारची एखादी घटना घडते, त्यानंतर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीला पकडणे सोपे होऊ शकते, मात्र सतत उदासीन असलेल्या पीएमपी प्रशासनाला याप्रकाराबाबत देखील कोणतेच गांभीर्य नसल्याचे एकंदरीत घडणाऱ्या प्रकरणांवरून दिसून येते.