लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटींच्या उत्पादनांवर- लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:08 IST2025-01-16T13:07:46+5:302025-01-16T13:08:38+5:30

दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे लष्करासाठी ‘पॉवरहाऊस’ असल्याचे मत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले.

85 percent of the military's capital expenditure is on indigenously manufactured products | लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटींच्या उत्पादनांवर- लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटींच्या उत्पादनांवर- लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

पुणे : आर्मी डे परेडमध्ये बुधवारी शस्त्रे, वाहने असे सर्व काही भारतीय बनावटीचे होते. आज भारतीय लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर होत आहे. संशोधन आणि विकास, उत्पादनासाठी पुण्याचे महत्त्व मोठे आहे. दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे लष्करासाठी ‘पॉवरहाऊस’ असल्याचे मत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सैन्य दिनानिमित्त आयोजित करण्यात व्यक्त केले.

बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या संचलन मैदानावर झालेल्या सैन्य दिन कवायतीच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. द्विवेदी म्हणाले, दक्षिण मुख्यालय हे सर्वांत मोठ्या मुख्यालयांपैकी एक आहे. देशातील ११ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश असा एकूण ४१ टक्के भूभाग दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित येतो. नौदलाची तीन मुख्यालये, हवाई दलाची चार मुख्यालयेही दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आहेत. येत्या काळात दक्षिण मुख्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

नेपाळप्रमाणे अन्य मित्र राष्ट्रांच्या पथकांना निमंत्रित करण्याबाबत लष्करप्रमुख म्हणाले, नेपाळप्रमाणे अन्य मित्र राष्ट्रांना निमंत्रित करायला नक्कीच आवडेल, असे सांगत येत्या काळात आणखी काही लष्करी बँड येऊ शकतील. अधिकाधिक संवादातून गरजेनुसार एकत्र काम करणे सोपे जाते, असे मत व्यक्त केले.

यंदाच्या सैन्य कवायतीत पहिल्यांदाच सेना पोलिसांच्या महिला अग्निवीर आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणी यात सहभागी झाल्या होत्या. याबाबत बोलताना द्विवेदी म्हणाले की, विकसित भारतात नारीशक्ती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तसेच पुढच्या काळात भारतीय लष्करातही महिलांची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे.

पुढील वर्षी माजी सैनिक, उद्योगांचाही समावेश

पुढील सैन्य दिन कवायतीसाठी गुवाहाटी, जयपूर, भोपाळ, जबलपूर अशी शहरे निवडली जाणार आहेत. लवकरच समिती नियुक्त करून आवश्यक सुविधांची उपलब्धता असलेल्या शहराची सैन्य दिन कवायतीसाठी निवड केली जाईल. पुढील वर्षी माजी सैनिक, संरक्षण उत्पादन करणारे उद्योग यांनाही सहभागी करून घेण्याचा विचार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

‘गलवान’ची पुनरावृत्ती नको...
भारतीय लष्कर नेहमीच पुरेशा संख्येने तैनात असल्याने देशाची उत्तर सीमा सुरक्षित आहे. मात्र, गलवानमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. - उपेंद्र द्विवेदी, लष्करप्रमुख

Web Title: 85 percent of the military's capital expenditure is on indigenously manufactured products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.