Pune: जास्त नफा कमविण्याच्या नादात तरुणाने गमावले ८ लाख, धनकवडी परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: December 25, 2023 15:19 IST2023-12-25T15:19:17+5:302023-12-25T15:19:49+5:30
हा प्रकार ४ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला. याबाबत (दि.२४) पोलिसांत फिर्याद दिली आहे...

Pune: जास्त नफा कमविण्याच्या नादात तरुणाने गमावले ८ लाख, धनकवडी परिसरातील घटना
पुणे : पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून महाविद्यालयीन तरुणाला गंडा घातल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. हा प्रकार ४ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला. याबाबत (दि.२४) पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीला अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. नेहा नामक महिलेने तुम्ही घरबसल्या टास्क पूर्ण करून भरपूर पैसे कमावू शकता, असे सांगितले. त्यानंतर वेगवेयळ्या प्रकारे टास्कची माहिती दिली. एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून टास्क देण्यात आले. सुरुवातीला १०० रुपये मोबदला देऊन तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणाला ८ लाख ३ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले.
एका वेबसाईटवर मिळालेला नफा दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात पैसे काढण्यास गेले असता पैसे निघत नसल्याने तक्रारदार यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्राद्र यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक माळाळे हे करत आहेत.