पुणे: पूना हॉस्पिटलने मृतदेह देण्यास आठ तास विलंब केल्याप्रकरणी मृताच्या नातेवाइकांनी आरोग्य प्रमुखांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने पूना हॉस्पिटलकडे खुलासाही मागितला होता. आता या प्रकरणावर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी (दि. ८) रोजी सकाळी ११:३० वाजता पूना हॉस्पिटल आणि फिर्यादी नातेवाईक यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावले आहे. दि. २५ एप्रिलच्या रात्री दीडच्या सुमारास शुक्रवार पेठ येथील महेश पाठक (वय ५३) या रुग्णाचा मृत्यू झाला होता.
रुग्ण शहरी-गरीब योजनेंतर्गत उपचार घेत असल्याने रात्रीच्या वेळेस बिलिंग कर्मचारी उपलब्ध नसल्याने सकाळी ८:३० वाजता मृतदेह घेऊन जाण्यास तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. तोपर्यंत मृतदेह शवागारात ठेवण्याबाबत नातेवाइकांनी संमती दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बिलिंग कर्मचारी आल्यावर शहरी-गरीब योजनेंतर्गत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मात्र हॉस्पिटलने केवळ बिलासाठी तब्बल आठ तास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला नसल्याची तक्रार मृत पाठक यांचे मेव्हणे नीलेश महाजन यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात लेखी तक्रार केली होती. आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे पूना हॉस्पिटलवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.