Pune Crime | पुण्यात धुळवडीचा झिंगाट, खून, खुनाच्या प्रयत्नांसह शहरात ८ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 09:07 IST2022-03-21T08:56:49+5:302022-03-21T09:07:43+5:30

मोटारसायकलवरून जात असणाऱ्याला चौघांनी अडवून कोयत्याने वार करून केला खून

8 crimes in the pune city including dhulwadi scuffle murder attempted murder | Pune Crime | पुण्यात धुळवडीचा झिंगाट, खून, खुनाच्या प्रयत्नांसह शहरात ८ गुन्हे

Pune Crime | पुण्यात धुळवडीचा झिंगाट, खून, खुनाच्या प्रयत्नांसह शहरात ८ गुन्हे

पुणे : होळी आणि धुळवडीला एकमेकांच्या अंगावर रंग उडविणे, जुना वाद यातून खून, खुनाचा प्रयत्न, तलवार, कोयत्यांचा वापर करून गंभीर जखमी करण्याचे किमान आठ प्रकार पुणे शहरात घडले. होळी आणि धुळवडीच्या दिवशी पोलीस दलाने शहरात सर्वत्र बंदोबस्त ठेवला होता. असे असतानाही अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या.

बिबवेवाडी येथील सुपर इंदिरानगरमध्ये सनी भोंडेकर, ओम खाटपे, नागेश फुलारी, विश्वास शिंदे हे एकमेकांना चिखल लावत होते. यावेळी योगेश पवार व त्याचे साथीदार तेथे आले. योगेश पवार याने नागेश फुलारी याच्यावर कोयत्याने वार केला. नागेशने तो हुकविला. तेव्हा विश्वास शिंदे त्याच्या मदतीला गेला असताना त्याच्यावरही वार करून जखमी करण्यात आले. हवेत कोयता फिरवून आरोपींनी परिसरात दहशत पसरविली. योगेश पवार हा मोटारसायकलवरून जात असताना चौघांनी त्याला अडवून कोयत्याने वार करून त्याचा खून केला.

येरवडा येथील कॉनस्ट्रिक्स डब्ल्यू एनएस कंपनीसमोर काही तरुण डान्स करीत होते. त्यावेळी निखिल मिसाळ हा हातात कोयता घेऊन नाच करीत होता. तेव्हा गणेश खैरे याने कोयता ठेवून दे, असे सांगितल्याने त्याच कोयत्याने निखिल याने गणेश याच्यावर वार केले. गणेशचा मित्र सिद्धार्थ त्याला सोडविण्यासाठी आला तर त्याच्यावरही कोयत्याने वार करण्यात आला.

आठजण गंभीर जखमी-

धुळवडीच्या दिवशी झालेल्या हाणामारीच्या घटनांमध्ये आठजण गंभीर जखमी झाले आहेत. येरवडा, बिबवेवाडी, ताडीवाला रोड, कोंढवा परिसरात या घटना घडल्या होत्या. ताडीवाला रोड येथे मित्र रंग खेळत असताना राजेश चंडालिया हा गुंड साथीदारासह आला. त्याने शिवीगाळ करून एका तरुणावर तलवार व लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले. त्याच्या बहिणीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.

होळीच्या पेटविलेल्या लाकडांचा धूर घरात येत असल्याच्या कारणावरून दोघा शेजाऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाले. याप्रकरणी सुवर्णा नामदेव खटाटे (३७, रा. कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कैलास सणस (५५), पल्लवी कैलास सणस (४५) आणि पंकज कैलास सणस (१९, रा. कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी लाकडी काठीने फिर्यादी यांच्या खांद्यावर व डोक्यावर मारून जखमी केले. त्यांच्या मामाचा मुलगा ऋषिकेश घारे याच्या दंडाचा चावा घेऊन जखमी केले.

Web Title: 8 crimes in the pune city including dhulwadi scuffle murder attempted murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.