संत ज्ञानेश्वरांची ७५० वी जयंती वर्ष! संपूर्ण महाराष्ट्रात येत्या १५ ऑगस्टला निघणार माऊलींची मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:08 IST2025-07-31T19:07:25+5:302025-07-31T19:08:14+5:30
१५ ऑगस्ट रोजी राज्यात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करावा

संत ज्ञानेश्वरांची ७५० वी जयंती वर्ष! संपूर्ण महाराष्ट्रात येत्या १५ ऑगस्टला निघणार माऊलींची मिरवणूक
आळंदी: संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. येत्या “गोकुळ अष्टमीला" अर्थातच १५ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती आहे. यापार्श्वभूमीवर सन २०२५ हे वर्ष सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'महोत्सव' म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केले आहे. या शासन निर्णयाचे समस्त वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी व आळंदी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.
यंदा तीर्थक्षेत्र आळंदीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरे होत आहे. या अनुषंगाने वर्षभरात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी आठ दिवसीय हरिनाम सप्ताहात किर्तन महोत्सव तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी (दि. २८) यंदाचे वर्षे ' माऊलींचे महोत्सव वर्षे' साजरा करण्यासंदर्भात संबंधित विभागाला निर्देश दिले होते. या अनुषंगाने येत्या १५ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक नगर व शहरांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका तसेच नगरपरिषदा यांनी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा आदेश जारी केला आहे. उपरोक्त नमूद सूचनांची सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना अवर सचिव अनिलकुमार रा. उगले यांनी संबंधितांना दिल्या आहेत.