जास्त परतावा देण्याच्या आमिषाने साडेसात कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:17 IST2024-12-12T21:17:55+5:302024-12-12T21:17:55+5:30

नारायणगाव येथील प्रकार : चार जणांवर गुन्हा, ७९ जणांची झाली फसवणूक

7.5 Crore fraud with the lure of paying higher returns | जास्त परतावा देण्याच्या आमिषाने साडेसात कोटींची फसवणूक

जास्त परतावा देण्याच्या आमिषाने साडेसात कोटींची फसवणूक

जुन्नर : पीएलसी अल्टिमा ( बिटकॉइन ) या कंपनीत पैसे गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाने नारायणगाव व परिसरातील ७९ गुंतवणूकदारांची ७ कोटी ६७ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांसह अनोळखी २ अशा एकूण ४ जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन बाळासाहेब पोखरकर (वय ४१, रा. वारूळवाडी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे), राजेंद्र सूर्यभान उपाध्याय (उपाध्ये) (वय ४२, रा. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद नितीन रावजी शेळके (रा. नारायणगाव) यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव व परिसरातील सुमारे ७९ जणांची पीएलसी अल्टिमा या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाने सुमारे ७ कोटी ६७ लाख ९४ हजार ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. नितीन पोखरकर यांनी पीएलसी अल्ट्रा कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल व वर्षाच्या शेवटी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळेल, अशी माहिती शेळके यांना दिली होती. त्या माहितीवर विश्वास ठेवून शेळके यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी रोख ५ लाख व ऑनलाईन १० लाख राजेंद्र उपाध्याय यांच्या नावाने संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील एका खाजगी बँकेत श्रीकृष्ण कॅटल अँड पोल्ट्री फीड नावाने असलेल्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली अशी १५ लाखांची गुंतवणूक पीएलसी अल्टिमा नावाच्या मोबाईल ॲपद्वारे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली आहे.

शेळकेसह नारायणगाव परिसरातील सुमारे ७९ जणांकडून १ डिसेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत सुमारे १ लाख ते ५५ लाखांपर्यंतची आर्थिक गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीत महिलांचाही सहभाग आहे. काही दिवसांनी गुंतवणूक केलेल्या पैशांसंदर्भात मागणी केली असता नितीन पोखरकर यांनी गुंतवणुकीचे पैसे देण्यास नकार देऊन शेळके यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

Web Title: 7.5 Crore fraud with the lure of paying higher returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.