बालेवाडी कोरोना रुग्णालयातून वृद्ध पळाला; १७ किलोमीटर चालत घरी पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 19:20 IST2020-04-29T19:17:40+5:302020-04-29T19:20:47+5:30

ही व्यक्ती येरवड्यात आल्याचे नागरिकांनी पालिकेला कळविल्यावर एकच धावपळ उडाली.

The 70 years old man escaped from Balewadi Corona Hospital; Reached home after walking 17 kilometers | बालेवाडी कोरोना रुग्णालयातून वृद्ध पळाला; १७ किलोमीटर चालत घरी पोहचला

बालेवाडी कोरोना रुग्णालयातून वृद्ध पळाला; १७ किलोमीटर चालत घरी पोहचला

ठळक मुद्देपुन्हा घरी नेण्याकरिता बोलवावे लागले बाधित मुलालाबालेवाडी येथील विलगीकरण कक्षासाठी जवळपास १२०० खोल्या उपलब्ध

पुणे : विलगीकरणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने बलेवाडी क्रीडा संकुलमधून पळ काढत तब्बल १७ किलोमीटरचे अंतर पायी चालत येरवड्यातील घर गाठले. ही व्यक्ती येरवड्यात आल्याचे नागरिकांनी पालिकेला कळविल्यावर एकच धावपळ उडाली.
पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील एका कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य व्यक्तींना बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. यामध्ये संबंधित ७० वर्षीय वृद्ध बुधवारी विलगीकरण कक्षामधून गायब झाला. या व्यक्तीचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, १७ किलोमीटर चालत चालत ही व्यक्ती येरवड्यातील त्यांच्या घरी पोचली होती. या व्यक्तीला घराच्या बाहेर बसल्याचे पाहिल्यावर स्थानिक नागरिकांनी नगरसेवकामार्फत पालिकेला संपर्क साधत माहिती कळविली. 
पालिकेचे पथक रुग्णवाहिकेसह दाखल झाले. त्यांनी या व्यक्तीला सोबत येण्याची विनंती केली. परंतु, ही व्यक्ती परत जाण्यास तयार नव्हती. पालिकेच्या रुग्णवाहिकेमधून जाण्यास ही व्यक्ती तयार होत नव्हती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत कोरोनाचे उपचार घेत असलेल्या त्या व्यक्तीच्या मुलाला रुग्णालयातून बाहेर आणले. त्यांना घरी आणत वडिलांना विलगिकरण कक्षात जाण्याची विनंती त्यांच्या मुलाने केली. मुलाने बराच वेळ मिनतवाऱ्या केल्यावर शेवटी ही वृद्ध व्यक्ती रुग्णवाहिकेमधून जाण्यास तयार झाली. त्यांना रुग्णवाहिकेमधून विलगीकरण केंद्रावर नेण्यात आले. 
----------
पत्रे लावून मार्ग करणार बंद
बालेवाडी येथील विलगीकरण कक्षासाठी जवळपास १२०० खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून आतापर्यंत ६५० नागरिक याठिकाणी आणण्यात आले आहेत. या नागरिकांना बाहेर जाता येऊ नये याकरिता आता केवळ एकच मार्ग ठेवण्यात येणार असून अन्य मार्ग पत्रे लावून बंद करण्यात येणार आहेत. यासोबत पालिकेने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

Web Title: The 70 years old man escaped from Balewadi Corona Hospital; Reached home after walking 17 kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.