पुण्यात तब्बल ७ लाख ७३ हजारांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 13:53 IST2022-05-27T13:39:08+5:302022-05-27T13:53:52+5:30
ही कारवाई २४ मे रोजी औषध अन्न व औषध प्रशासन विभागाकडून झालीय...

पुण्यात तब्बल ७ लाख ७३ हजारांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून ७ लाख ७३ हजार साठा जप्त करण्यात आला आहे. वाकडमधील दत्त मंदिराजवळील मे. ग्रूमिंग एन्टरप्राइसेस प्रा. लि. येथे ही कारवाई झाली. ही कंपनी विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करुन त्यांची विक्री करत होती.
ही कारवाई २४ मे रोजी औषध अन्न व औषध प्रशासन विभागाकडून झाली. कंपनीने विनापरवाना बनावट शाम्पू, कंडिशनर, बिअर्ड वॉश, हेअर ट्रीटमेंट व विविध केरेटीनयुक्त सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करुन विक्री केल्याचेही तपासात उघडकीस आले. निरीक्षक महेश कवटीकवार, अतिश सरकाळे, रझीया शेख व सहायक आयुक्त के.जी.गादेवार यांनी धाड टाकत ही कारवाई केली. औषध निरीक्षकांनी ७ लाख ७३ हजार रुपयांची सौंदर्य प्रसाधने व त्यांच्या उत्पादन करण्याकरीता लागणारा कच्चा माल, पॅकींग मटेरीयल, बॉटल्स, लेबल्स इ. साहित्य जप्त केले.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील, सौंदर्य प्रसाधने नियम २०२० प्रमाणे सौंदर्य प्रसाधने उत्पादनासाठी नमुना Cos 8 मध्ये परवाना घेणे अनिवार्य आहे. विनापरवाना उत्पादन करणे कायदयाने गुन्हा आहे. विनापरवाना उत्पादन करु नये असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून सौंदर्य प्रसाधन उत्पादन परवान्याच्या माहितीसाठी संबंधितांनी अन्न व औषध प्रशासन, गुरुवार पेठ, पुणे येथील कार्यालयात संपर्क साधण्यास सांगितले आहे. सौंदर्य प्रसाधने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी सुद्धा लेबलवर उत्पादन परवाना नमुद असल्याची खात्री करावी व बिलांव्दारे त्याची खरेदी करण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.