पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा
By नितीन चौधरी | Updated: December 21, 2023 14:14 IST2023-12-21T14:13:29+5:302023-12-21T14:14:17+5:30
उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी

पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा
पुणे: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील ७२ गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यातील ४४ गावांच्या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड तयार केला असून तो राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. हा आराखडा ६८ कोटी १७ लाख रुपयांचा आहे.
केंद्रीय सरकारी यंत्रणांनी सर्वेक्षण केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सुमारे ७२ गावे ही धोकादायक अर्थात दरडप्रवण क्षेत्रे असल्याचे जाहीर केले आहे. राज्य व केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या विविध आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीमुळे जीवित तसेच वित्त हानी टाळण्यासाठी उपायोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी या ७१ गावांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. विभागाने हा आराखडजा तयार करण्याासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाची मदत घेतली होती. त्यात त्यापैकी सुमारे ४४ गावांमध्ये उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. आता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य सरकारकडे पाठविला असून येथील उपाययोजनांसाठी ६८ कोटी १७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.
धोकादायक गावे
भोर – डेहेन, नानावळे, सोनारवाडी, कोर्ले जांभुळवाडी.
मुळशी – कळमशेत, विठ्ठलवाडी, ओझकरवाडी, हिवाळे वस्ती, गडले (दूधवान वस्ती), कोळावडे, साईव.
वेल्हे - माणगाव, घोळ गाराजाईवाडी/गर्जेवाडी, रुळे धनगरवाडी, कादवे, वडघर शिर्कोली टेकेपोळे रस्ता, आंबवणे , सिंगापूर, हरपूड, वडघर, घोल, घिवशी.
जुन्नर – हातवीज, भिवाडे खु, घंगाळदरे, भिवाडे बु.
मावळ – कळकराई , माऊ (मोरमारवाडी), वाऊंड, वडेश्वर, फलाने, मालेवाडी,वेहेरगाव, कुसवली.
आंबेगाव – कोलतावडे, तळपेवाडी, सावरली, आमडे, आसाणे, बोरघर, बोरघर (दरेवाडी), पांचाळे खुर्द, दिगद, अडीवरे.