६५ वर्षांच्या वडिलांनी केला ३२ वर्षीय मुलाचा खून, न्यायालयाने सुनावली जन्मठेप, पुढचे आयुष्य तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:45 IST2025-07-01T19:44:52+5:302025-07-01T19:45:03+5:30
वडिलांनी कोणत्या तरी कारणाने डोक्यात, डाव्या कानावर कुऱ्हाडीने वार करून मुलाचा खून केला होता

६५ वर्षांच्या वडिलांनी केला ३२ वर्षीय मुलाचा खून, न्यायालयाने सुनावली जन्मठेप, पुढचे आयुष्य तुरुंगात
पुणे : कुऱ्हाड डोक्यात घालून मुलाचा खून करणाऱ्या वडिलांना न्यायालयाने दणका दिला आहे. जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.आय.पेरमपल्ली यांनी सुनावली. मात्र, त्याने कोणत्या कारणाने मुलाचा खून केला हे कळू शकले नाही.
दशरथ चिमाजी जमदाडे (वय ६५, रा. माळवाडी वीर, ता. पुरंदर) असे जन्मठेप झालेल्या वडिलांचे नाव आहे. गणेश (वय ३२) याच्या खून प्रकरणी त्याचा चुलत भाऊ योगेश जमदाडे याने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सत्र न्यायालय पैरवी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, न्यायालय पैरवी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक जयसिंग जाधव यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. ही घटना १५ जानेवारी २०१९ रोजी त्यांच्या राहत्या घरात घडली. दशरथ याने कोणत्या तरी कारणाने डोक्यात, डाव्या कानावर कुऱ्हाडीने वार करून मुलगा गणेश याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.