पुणे पोलिसांच्या 'कोंबिंग ऑपरेशन'मध्ये ५५ गुन्हेगारांना अटक; १ पिस्तुल, ३१ कोयते, ४ तलवार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 21:09 IST2021-08-12T21:06:59+5:302021-08-12T21:09:23+5:30

कोंबिंग ऑपरेशनमध्ये ३०८ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई...

55 criminals arrested in Pune police combing operation; 1 pistol, 31 koyate, 4 swords seized | पुणे पोलिसांच्या 'कोंबिंग ऑपरेशन'मध्ये ५५ गुन्हेगारांना अटक; १ पिस्तुल, ३१ कोयते, ४ तलवार जप्त

पुणे पोलिसांच्या 'कोंबिंग ऑपरेशन'मध्ये ५५ गुन्हेगारांना अटक; १ पिस्तुल, ३१ कोयते, ४ तलवार जप्त

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाने बुधवारी मध्यरात्री राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात ५५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या कारवाईत एक पिस्तुल, ३१ कोयते, ४ तलवारी, पालघन, सुरा अशी हत्यारे जप्त करण्यात आली. तसेच तडीपार केले असतानाही ९ गुंड शहरात वावरत असल्याचे आढळून आले असून त्यांना अटक केली आहे. तसेच ३०८ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोंबिंग ऑपरेशनचा आदेश दिला होता. त्यानुसार बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी पहाटे १ वाजेपर्यंत ऑपरेशन राबविण्यात आले. तसेच ४१७ हॉटेल, लॉजेस, ढाबे, एस टी, रेल्वे बसस्थानके, तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणार्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकूण २ हजार ३८९ गुन्हेगार तपासण्यात आले. त्यापैकी ८१९ गुन्हेगार मिळून आले. हडपसर परिसरातील आरोपीकडून १ पिस्तुल जप्त करण्यात आले. हत्यारे बाळगणार्या ३७ जणांवर कारवाई करुन अटक करण्यात आली. दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ गुंडांना अटक करण्यात आली.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक मल्लेश देवकर (वय २५, रा. इंदिरानगर, लोहगाव) याच्याकडून २० हजार रुपयांचा १ किलो ९७५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभिजित सुभाष गोरविले (वय २०, रा. शिवदर्शन, पर्वती) याच्या ताब्यातून ११ हजार १०० रुपयांचा ५६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, नामदेव चव्हाण, डॉ. संजय शिंदे तसेच सर्व पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. यापुढेही कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येऊन गुन्हेगारांचे हालचालींवर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: 55 criminals arrested in Pune police combing operation; 1 pistol, 31 koyate, 4 swords seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.