Purandar airport : ५० हेक्टरची मोजणी पूर्ण, शेतकऱ्यांचे सहकार्य, २५ दिवसांत मोजणी होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:03 IST2025-09-27T13:02:54+5:302025-09-27T13:03:29+5:30
तीन गावांतील सुमारे ७५ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Purandar airport : ५० हेक्टरची मोजणी पूर्ण, शेतकऱ्यांचे सहकार्य, २५ दिवसांत मोजणी होणार पूर्ण
पुणे :पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी अखेर जमीन मोजणीस सुरुवात झाली. एकूण सात गावांपैकी पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी (दि.२६) तीन गावांतील सुमारे ७५ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. ही मोजणी करताना शेतकऱ्यांनी सहकार्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील २५ दिवसांत ही मोजणी पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
विमानतळासाठी भूसंपादनास सुमारे २ हजार ८१० एकरची संमती मिळाल्यानंतर जमिनीच्या प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात करण्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारपासून मोजणीस सुरुवात करण्यात आली. त्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. विमानतळासाठी पारगाव मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभारवळण या सात गावांमधील सुमारे ३ हजार एकरचे संपादन करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या दिवशी मुंजवडी, खानवडी, एखतपूर या तीन गावांत मोजणीस प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी ५ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यात महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम, कृषी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांनी सुमारे ५० हेक्टरची मोजणी केल्याची माहिती डुडी यांनी दिली. संपूर्ण मोजणी करण्यासाठी सुमारे २५ दिवसांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांपैकी एखतपूर या गावात २ मे रोजी ड्रोन सर्वेक्षणास सुरुवात केल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजबाबत चर्चा सुरू झाली. त्यांनतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना विकसित भूखंडासह चारपट मोबदला देण्यात जाहीर केले. परिणामी शेतकऱ्यांनी सुमारे ९३ टक्के जमिनीच्या संपादनास संमती दिली. त्यामुळे मोजणीच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा असेल, याची उत्सुकता होती.
शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे पहिल्या दिवशी ५० हेक्टरची मोजणी झाली. पुढील २५ दिवसांत मोजणी करण्याचे उद्दिष्ट आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी