११५ कोटींचे ४५ किलो ड्रग्ज; राज्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा साठा, शिंदेंनी राजीनामा द्यावा - सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:30 IST2025-12-18T12:29:21+5:302025-12-18T12:30:02+5:30
कोयना धरण परिसरात बांधकाम करता येत नाही, तरीही धरण क्षेत्रामध्ये हॉटेल कसे उभारले गेले? सुषमा अंधारे यांचा सवाल

११५ कोटींचे ४५ किलो ड्रग्ज; राज्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा साठा, शिंदेंनी राजीनामा द्यावा - सुषमा अंधारे
पुणे : सातारा जिल्ह्यातील सावरी गावात अंदाजे ११५ कोटी रुपयांचा ४५ किलोचा ड्रग्ज साठा ज्या रिसॉर्टपासून काही अंतरावर असणाऱ्या शेडमध्ये सापडला आहे. ते शेड रिसॉर्टच्या जवळ असून रिसॉर्टपासून शेडकडे जाण्यासाठी स्वतंत्र असा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच शेडमध्ये असणाऱ्या लोकांना जेवण या रिसॉर्टमधून जात होते. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांचे आहे. त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणाशी प्रकाश शिंदे यांचा काही संबंध आहे का याचा तपास नि:पक्षपाती होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
पुण्यातील पत्रकार भवन येथे बुधवारी (दि. १७) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अंधारे यांनी शिंदे यांच्यावर आरोप केला. त्या म्हणाल्या, ‘सातारा जिल्ह्यातील सावरी गावामध्ये शनिवारी (ता. १३) पोलिसांनी छापा घालून ११५ कोटी रुपये किमतीचा ४५ किलो ड्रग्ज व अमली पदार्थांचा साठा ताब्यात घेतला. राज्यातील आत्तापर्यंतचा हा सर्वांत मोठा अमली पदार्थाचा साठा आहे. पोलिसांनी आरोपींना पकडले, त्यावेळी त्यांना तेथील एका रिसॉर्टमधून जेवण जात होते. संबंधित रिसॉर्ट हे प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे असून, रणजीत शिंदे संबंधित रिसॉर्ट चालवत आहेत. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे भाऊ आहेत, तर रणजीत शिंदे हे दरेगावचे सरपंच असून, एकनाथ शिंदे यांचे गावही दरेगाव आहे. त्यामुळे धनंजय मुंडे, पार्थ पवार यांना जे नियम लावले, तेच नियम एकनाथ शिंदे यांना लावून त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा.'
अंधारे म्हणाल्या, संबंधित परिसरात इतर हॉटेल असताना शिंदे यांच्याच हॉटेलमधून आरोपींना जेवण कसे पुरविले गेले? प्रकाश शिंदे यांच्या दोन्ही मुलांच्या नावांवरून हॉटेलचे नाव ठेवण्यात आले आहे. रणजित शिंदेंचे श्रीकांत व एकनाथ शिंदे यांच्यासमवेत फोटो आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रणजित शिंदे यांनी बॅनरही लावले होते. प्रकाश शिंदे यांची ओळख पोलिस अधिकाऱ्यांनी का लपवून ठेवली. पोलिस अधिकारी बोलत नाहीत, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. संबंधित हॉटेल बेकायदा आहे. कोयना धरण परिसरात बांधकाम करता येत नाही, तरीही धरण क्षेत्रामध्ये हॉटेल कसे उभारले गेले ? नगरविकास खात्याचा वापर करून हॉटेलची उभारणी झाली आहे का? याचा तपास होण्याची गरज आहे,' असेही त्या म्हणाल्या.