भूमिअभिलेखच्या भूकरमापक पदासाठी ३७ हजार अर्ज, ९०३ पदांसाठी होणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:33 IST2025-10-29T18:33:01+5:302025-10-29T18:33:25+5:30
- येत्या १३, १४ नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा

भूमिअभिलेखच्या भूकरमापक पदासाठी ३७ हजार अर्ज, ९०३ पदांसाठी होणार भरती
पुणे : भूमिअभिलेख विभागात भूकरमापकांची सरळसेवेने ९०३ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाइन ३७ हजार १५२ अर्ज दाखल झाले आहेत. या पदासाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहेत.
राज्य सरकारने भूमिअभिलेख विभागात दोन वर्षांपूर्वी खासगी एजन्सीद्वारे सुमारे बाराशेहून अधिक पदांची भरती परीक्षेच्या माध्यमातून केली होती. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली होती. त्यातील काही उमेदवार संबधित ठिकाणी रुजू झाले होते. मात्र, त्यानंतर सुमारे सहाशेहून अधिक उमेदवारांनी रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांची अनेक पदे पुन्हा रिक्त झाली. परिणामी मोजणी प्रकरणे प्रलंबित राहू लागली.
ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी भूकरमापकांच्या पदभरतीसाठी राज्य सरकारकडे पुन्हा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर एका खासगी एजन्सीमार्फत भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली. हे अर्ज उमेदवारांकडून १ ते २४ ऑक्टोबर यादरम्यान ऑनलाइन मागविण्यात आले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर १३ आणि १४ नोव्हेबर रोजी परीक्षा होणार आहे.
विभाग--पदांची संख्या -- प्राप्त अर्ज
पुणे ---- ८३--३९०७
कोकण -- २५९--९७९४
नाशिक ----१२४-- ५३२७
संभाजीनगर-- २१०---९९४२
अमरावती ---११७---४३४७
नागपूर ---११०--३८३५
एकूण --९०३--३७१५२