पार्सलद्वारे पाठवलेले ३५ मोबाइल ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचा-याने लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 18:39 IST2018-04-14T18:39:09+5:302018-04-14T18:39:09+5:30
३५ मोबाइलचे पार्सल आरोपी काम करीत असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात ८ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता तेलनवार याच्याकडे दिले.

पार्सलद्वारे पाठवलेले ३५ मोबाइल ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचा-याने लांबवले
पुणे : नागपूरसाठी पाठलेले ३५ मोबाइलचे पार्सल ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचा-याने लांबविल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधित कर्मचा-याला येरवडा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. श्रीस नितीन तेलनवार (वय २२, रा. सत्कार हॉटेलजवळ, खराडी-बायपास, मुळ रा. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचा-याचे नाव आहे. याप्रकरणी राहूल रतन वाधवानी (वय ३१, रा. कांचन अर्पांटमेंट, गणेश हॉटेल, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मोबाइल खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. त्यांना नागपूर येथील सीटी कलेक्शन या कंपनीची एमआय कंपनीच्या ३५ मोबाइलची आॅर्डर मिळाली होती. त्यामुळे त्यांनी एसए मॉडेलचे १० , ए १ मॉटेलचे २० आणि नोटफाईव्ह प्रो या मॉडेलचे ५ असे एकूण ३५ मोबाइलचे पार्सल आरोपी काम करीत असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात ८ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता तेलनवार याच्याकडे दिले. मात्र त्याने मोबाइल नागपुरला न पाठवला त्याचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सरकारी वकील वामन कोळी यांनी आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून मोबाइल जप्त करण्यासाठी तसेच त्यांचे कोणी साथीदार आहेत का याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य करीत आरोपीला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. .