३ लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांनी वर्षात भरला १९ कोटींचा दंड; तपासणी मोहीम राबवूनही संख्या कमी होईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:50 IST2025-04-30T16:49:46+5:302025-04-30T16:50:33+5:30
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना तिकीट तपासणीदरम्यान एका वर्षात ३ लाख ६० हजार ७८५ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले

३ लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांनी वर्षात भरला १९ कोटींचा दंड; तपासणी मोहीम राबवूनही संख्या कमी होईना
पुणे : पुणे विभागाकडून गेल्या वर्षभरात राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत पुणे विभागातील सर्व स्थानकांतील तब्बल ३ लाख ६० हजार ७८५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून १९ कोटी ०३ लाख ६३ हजार ८६० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करूनही फुकटे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना तिकीट तपासणीदरम्यान एका वर्षात ३ लाख ६० हजार ७८५ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १९ कोटी ०३ लाख ६३ हजार ८६० रुपये इतके दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये आरक्षित स्लीपर बोगीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या तब्बल ६७ हजार प्रवाशांकडून तीन कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला. तर प्रवासादरम्यान क्षमतेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून ७ लाख ७३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
...तरीही फुकटे कमी होईनात
फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवून यंदा कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संख्या घटली आहे. तरीही रेल्वेतून फुकट प्रवास करण्याचे प्रमाण उत्तरेकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून गोरखपूर, दानापूर, इंदूर, झेलम या गाड्यांमध्ये वारंवार तिकीट तपासनिसांची संख्या वाढविण्यात येते. तरीही या गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहे. -हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
अशी आहे आकडेवारी
विनातिकीट - २,८८,६९१
बेकायदेशीर - ६७,१८३
सामान बुक न करता जाणारे - ४९११
एकूण कारवाई - ३,६०,७८५
एकूण दंड वसूल - १९, ०३, ६३,८६०