कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:02 IST2025-02-22T10:02:40+5:302025-02-22T10:02:55+5:30

आरोपींच्या विरोधात साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मागितली पोलीस कोठडी

3 accused who beat up a youth in Kothrud remanded in police custody till February 24 | कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांची जनमानसात व समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे दहशत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी यांनी न्यायालयात केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एच. वानखेडे यांनी कोथरूडमध्ये भरदिवसा तरुणाला मारहाण करणाऱ्या एका टोळीशी संबंधित तीन आरोपींना दि. २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे.'

ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५, शिंदे चाळ, संजय चौक, शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडिबा पडवळ ( वय ३१ , शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) आणि अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. लालबहाद्दूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी पोलिस कोठडी दिलेल्या आरोपीची नावे आहेत. देवेंद्र जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौकात ही घटना घडली. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तिघांना अटक करून शुक्रवारी ( दि. २२) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांच्यासोबत इतर आरोपींचे संगनमत होते का? किंवा कसे याबाबत तपास करणे आवश्यक आहे. तपासादरम्यान सखोल विचारपूस करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला तर सुरुवातीला किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल असताना जाणीवपूर्वक जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही, अशा प्रकारे खोटे गुन्हे दखल होणार असतील तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: 3 accused who beat up a youth in Kothrud remanded in police custody till February 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.