जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 20:40 IST2022-03-02T20:40:10+5:302022-03-02T20:40:40+5:30
महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे

जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान
वडगाव कांदळी : जाधववाडी (ता. जुन्नर) येथील देवमळा परिसरातील २० ते २५ एकर ऊस बुधवार (दि.२) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने जाळून खाक झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील पाडुरंग जाधव यांच्या शेतातून विजेचा खांब गेला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पणे शाॅर्टसर्कीट होऊन ठिणगी पडल्याने आग लागली. त्यामुळे आजुबाजुला असलेल्या शेतातील उसाने पेट घेऊन मोठे नुकसान झाले असल्याचे बबन जाधव यांनी सांगितले.
यामध्ये बबन जाधव, पांडुरंग जाधव, आत्माराम जाधव, ज्ञानदेव जाधव , शरद बांगर, लक्ष्मण जाधव, राजेंद्र जाधव, अरूणा जाधव, दत्तु जाधव या शेतक-यांचा जवळपास २० ते २५ एकर ऊस जळाला असुन त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी विद्युत विभागाचे अधिकारी तसेच साखर कारखान्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली.