महिन्यात २२ जणांचा अपघातात बळी, आता तरी विचार करा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:18 PM2020-02-05T15:18:39+5:302020-02-05T15:23:21+5:30

जानेवारी महिन्यात  पुणे शहरात २० प्राणघातक अपघात झाले असून त्यात २२ जणांना आपला जीव गमवावा.

22 death by accident in one month think about it now? | महिन्यात २२ जणांचा अपघातात बळी, आता तरी विचार करा ?

महिन्यात २२ जणांचा अपघातात बळी, आता तरी विचार करा ?

Next
ठळक मुद्देअपघात रोखणे सर्वांची जबाबदारी 

पुणे : सुमारे ९०० सीसीची बाईक, प्रचंड वेग, विनाहेल्मेट, अवघे २४ वय वर्षे आणि मध्य वस्तीतील भरदुपारी रस्ता मोकळा असताना झालेला भीषण अपघात़ या अपघाताचा व्हिडीओ लोकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. त्यामुळे भारी भारी गाड्या आणि वेगाने जाणाऱ्या बाईकस्वारांचा आताच सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता असल्याचा विचार बळावू लागला आहे. पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी पुणेपोलिसांच्या ट्विटरवर हा मेसेज टाकला व सर्वांना प्रश्न विचारला, की हे उपनगरात नाही तर मध्य वस्तीत घडले आहे. आता त्याचा विचार करणार नाही तर कधी? त्याला हजारोंनी प्रतिसाद दिला आहे. 
रविवारी दुपारी बारा वाजता टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या पुढे काही अंतरावर हा अपघात झाला. तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये या अंगावर शहारे आणणारी अपघाताची दृश्ये कैद झाली होती. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. जवळपास २५ हजार लोकांनी याला प्रतिसाद दिला असून अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यातूनच यातील गांभीर्य समोर येऊ लागले आहे.  आकाश विधाते २४ वर्षांचा तरुण स्पोर्ट्स बाईकवर अलका चित्रपटगृहाकडून टिळक रोडने अतिशय वेगाने जात होता. दुपारची वेळ व न्यूझीलंड-भारत यांच्यातील टी-२० सामना असल्याने रस्त्यावर जवळपास गर्दी नव्हती़. त्यामुळे तो अतिशय वेगाने स्वारगेटकडे जात होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  त्याने साहित्य परिषद येथील सिग्नलही तोडून तो पुढे गेला होता. त्याचवेळी लिमयेवाडी येथील बोळातून रिक्षा टिळक रोडवर आली. तिला कोथरूडकडे जायचे असल्याने ती अलका टॉकीजकडे जाऊ लागली. तिने जवळपास अर्धा रस्ता ओलांडला असताना आकाश वेगाने आला. रिक्षा पाहून त्याला आपल्या बाईकचा वेग आवरता आला नाही. त्याने रिक्षाला धडक दिली़. पण बाईकचा वेग इतका होता, की तो रस्त्याच्या दुसºया बाजूला वेगाने घसरत गेला. त्याचवेळी स्वारगेटहून एक पीएमपी बस येत होती. कोणाला काही समजायच्या आत तो बाईकसह बसच्या खाली गेला. हा अपघात पाहून लोक धावून आले. परंतु, आकाशला कोणी वाचवू शकले नाही. 
ट्विटरवर प्रतिक्रिया देताना रुतुल थोरात याने सांगितले, की पोलिसांनी दंड केल्यावर मी हेल्मेट वापरायला सुरुवात केली़.आता मला सुरक्षित वाटत आहे.अशाच प्रकारे अनेकांनी याची गंभीर दखलही घेतली आहे़.
.....
अपघात रोखणे सर्वांची जबाबदारी 
याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी सांगितले, की टिळक रोडवरील अपघात पाहिल्यानंतर तरी आपण आता विचार करणार नाही तर कधी करणाऱ? जानेवारी महिन्यात  पुणे शहरात २० प्राणघातक अपघात झाले असून त्यात २२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्राणघातक अपघात रोखण्याची ही सर्वांची जबाबदारी आहे.
.....
शहरात तसेच उपनगरात वेगाने जाणाऱ्या बाईकस्वारांमध्ये तरुणांची संख्या असते. अचानक काही तरी होते आणि मग एक कुटुंब आता तोंडाशी आलेल्या तरुणाला गमावते. तो कोणाचा भाऊ असतो, कोणाचा एकुलता तर कोणाचा पती़ काहींच्या खांद्यावर तर अख्ख्या कुटुंबाचा आधार असतात. 

Web Title: 22 death by accident in one month think about it now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.