आखाड पार्टीसाठी कोंबड्यांवर डल्ला; २० कोंबड्या पळविणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 22:07 IST2021-08-02T22:05:29+5:302021-08-02T22:07:40+5:30

एका चिकन सेंटरच्या दुकानातील खुराड्यावर डल्ला मारुन २० कोंबड्या चोरुन नेल्याचा प्रकार समोर

20 hens thief caught in CCTV at the pune | आखाड पार्टीसाठी कोंबड्यांवर डल्ला; २० कोंबड्या पळविणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद

आखाड पार्टीसाठी कोंबड्यांवर डल्ला; २० कोंबड्या पळविणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद

पुणे : श्रावण महिन्यात बहुसंख्य जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे त्याअगोदर आषाढात मांसाहार करणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यासाठी पार्टयाही जोरदार रंगत असतात. अशाच आखाड पार्टी साजरी करण्यासाठी चोरट्यांनी चक्क एका चिकन सेंटरच्या दुकानातील खुराड्यावर डल्ला मारुन २० कोंबड्या चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

हडपसरमधील हिंगणे मळा येथे हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. त्यात एका चिकन सेंटरच्या दुकानाबाहेर असलेल्या खुराड्यातील कोंबड्या चोरणारे दोघे जण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

हिंगणे मळा येथे इस्लाम शेख यांचे चिकन सेंटर आहे. ते नेहमीप्रमाणे रात्री चिकन सेंटर बंद करुन घरी गेले होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यांनी सेंटर समोर ठेवलेल्या खुराड्यातील तब्बल २० कोंबड्या काढून पोत्यामध्ये भरून दुचाकीवरुन धूम ठोकली. खुराड्यातून कोंबड्या काढत असताना त्या ओरडत होत्या. पण आजू बाजूच्या लोकांना त्या नेहमीच ओरडत असल्याने कोणी लक्ष दिले नाही. सकाळी शेख हे आले. तेव्हा त्यांना कोंबड्या चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यात कोंबडी चोरटे कैद झाल्याचे दिसून आले.

Web Title: 20 hens thief caught in CCTV at the pune