दुर्दैवी! सोसायटीत सायकल खेळत असलेल्या २ वर्षाच्या चिमुरड्याला टँकरने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:56 IST2022-01-01T16:45:26+5:302022-01-01T16:56:46+5:30
अपघातानंतर आरोपी अपघातस्थळी न थांबता पळून गेला...

दुर्दैवी! सोसायटीत सायकल खेळत असलेल्या २ वर्षाच्या चिमुरड्याला टँकरने चिरडले
पिंपरी : सोसायटीत खेळत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुरड्याला टॅंकरने धडक दिली. यात चिरडला गेल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टँकर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जाधववाडी, चिखली येथे ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मेनगेटच्या समोर शुक्रवारी (दि. ३१) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
मोहमद अदनान (वय २) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. सोमेश मेहकर (रा. चिखली), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रिजाजउद्दीन रोजअली मनियार (२४, रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई त्यांचा नातू मोहमद अदनान याला सायकल खेळण्यासाठी घेऊन जात होत्या. त्यावेळी आरोपी सोमेश मेहकर हा पाण्याचा टॅंकर घेऊन आला. ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मेनगेटच्या समोर आरोपीच्या टॅंकरचा मोहमद अदनान याच्या सायकलला धक्का लागला. यात मोहमद अदनान हा टॅंकरखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी अपघातस्थळी न थांबता पळून गेला.