Pune News | स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:47 IST2022-06-15T14:46:25+5:302022-06-15T14:47:38+5:30
वडगाव खुर्द येथील घटना; बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News | स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
धायरी : नऱ्हे येथील शाळेतून विद्यार्थ्यांना घरी सोडायला निघालेल्या स्कूलबसमधून एक विद्यार्थी खाली उतरल्यानंतर त्याच स्कूलबसच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील स्व. मुरलीधर लायगुडे रुग्णालयासमोर घडला. अर्णव अमोल निकम (वय १२ वर्षे १० महिने, रा. राजयोग सोसायटी, वडगाव खुर्द) असे मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी चालक दत्तात्रय लक्ष्मण पेठकर (वय ४९, रा. धनकवडी) यांच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील राजयोग सोसायटी येथे राहणारा अर्णव सकाळी स्कूलबसने नऱ्हे येथील एका शाळेत गेला होता. दुपारी शाळा सुटल्यानंतर बस मुलांना घेऊन घरी सोडण्यास आली होती. यावेळी बस सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील लायगुडे रुग्णालयासमोर थांबत असतानाच अर्णव बसमधून खाली उतरला. त्यानंतर बस मुलांना घेऊन पुढे जात असताना तो बसच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला.
यावेळी लायगुडे रुग्णालयातील डॉ. शुभांगी शाह, कल्पेश घोलप व कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.