राहुल गांधी यांच्या वादग्रस्त भाषणाचे २ पेन ड्राइव्ह न्यायालयात सादर; पुढील सुनावणी १६ डिसेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:27 IST2025-12-11T19:27:15+5:302025-12-11T19:27:46+5:30
पुरावे म्हणून दोन पेन ड्राइव्ह सादर केल्याचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल, असे न्यायालयाने फिर्यादीच्या वकिलांना स्पष्ट केले

राहुल गांधी यांच्या वादग्रस्त भाषणाचे २ पेन ड्राइव्ह न्यायालयात सादर; पुढील सुनावणी १६ डिसेंबरला
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लंडनमधील वादग्रस्त भाषण असलेली सीडी न्यायालयात न चालल्याने फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी भाषणाचे दोन पेन ड्राइव्ह न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले आणि ते न्यायालयात चालविण्याची विनंती करणारा अर्ज गुरुवारी (दि.12) दाखल केला. मात्र, राहुल गांधी यांच्या वकिलांनी या अर्जावर हरकत नोंदविली. यावर दि. 16 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात लोकसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. गुरुवारी (दि. 11) या खटल्याची सुनावणी पार पडली. मागील सुनावणीत न्यायालयातील सरतपासणी दरम्यान सीडी रिकामी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी तहकुबी मागणाऱ्या सात्यकी सावरकरांना न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला होता. खासदार-आमदारांविरोधातील खटले अनावश्यक तहकुबी न देता नियमित चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयाने दिले आहेत. तहकुबी द्यायची असल्यास न्यायालयाने कारणे नोंदविणे आवश्यक आहे. त्यानुसार, तक्रारदारांना या खटल्यात पुरावे सादर करण्यासाठी व सरतपासणी करण्यासाठी संधी दिली पाहिजे. असे विशेष न्यायालयाने नमूद करून राहुल गांधी यांच्या वकिलांचा तहकुबीला आक्षेप घेणारा अर्ज फेटाळला होता.
त्यानुसार फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील अँड संग्राम कोल्हटकर यांनी पुरावा म्हणून दोन पेन ड्राइव्ह न्यायालयात सादर करीत हे गांधी यांचे लंडनमधील भाषण असल्याचा दावा केला आणि ते न्यायालयात चालविण्याची विनंती केली. मात्र राहुल गांधी यांचे वकील अँड मिलिंद पवार यांनी यापूर्वी फिर्यादींकडून सादर केलेली लंडन भाषणाची सीडी न्यायालयात रिकामी निघाली होती असे सांगत आज पुन्हा दोन नवीन पेन ड्राइव्ह दाखल करण्याच्या प्रक्रियेवर जोरदार हरकत नोंदवली. न्यायालयाने देखील पेन ड्राइव्ह चालविण्यास नकार दिला. पुरावे म्हणून दोन पेन ड्राइव्ह सादर केल्याचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल, असे न्यायालयाने फिर्यादीच्या वकिलांना स्पष्ट केले.