पुणे : पूर्वी झालेल्या भांडणातून तिघांनी एका तरूणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास बाजीराव रस्त्यावर घडली. या हल्ल्यात मृत तरुणाचा मित्रही जखमी झाला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी फरार झालेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मयंक सोमदत्त खरारे (१७ रा. साने गुरुजीनगर, आंबीलओढा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर अभिजित संतोष इंगळे (१८, रा. दांडेकर पूल) असे हल्ल्यात जखमी झालेल्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित हे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळ थांबले होते. यावेळी तिघांंनी मयंकवर कोयत्याने वार केले. यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या अभिजितवरही हल्लेखोरांनी वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या मयंक व अभिजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मयंकचा मृत्यू झाला असून अभिजीतवर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत असून हा हल्ला पूर्वी झालेल्या भांडणातून केल्याची प्राथमिक माहिती हाती आल्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांनी दिली.
मयंक खरारे हा मुळचा मंगळवार पेठेत राहणारा आहे. त्याची आई महापालिकेत कामाला आहे. त्यामुळे त्यांना साने गुरुजीनगर येथे खोली मिळाली आहे. तेथे ते राहतात. दोन महिन्यांपूर्वी जनता वसाहतीतील मुलांबरोबर त्याची भांडणे झाली होती. मयंक खरारे आणि अभिजित इंगळे हे दुचाकीवरुन दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगरकडे जात होते. बाजीराव रोडवरील टेलिफोन भवन जवळ मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यांनी मयंक खरारे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात तो जागीच कोसळला. त्याचा वाचविण्यासाठी गेलेल्या अभिजित इंगळे यालाही कोयता गालाला लागून जखम झाली. आपली ओळख लपविण्यासाठी हल्लेखोरांनी तोंडाला मास्क लावला होता.
पुण्यात दिवसाढवळ्या खून, तोडफोडच्या घटना वाढू लागल्या आहेत. मागील आठवड्यात गणेश काळेचा टोळीयुद्धातून भरदिवसा खून करण्यात आला होता. हा खून कोंढवा भागात झाला होता. त्यानंतर आठवडाभरातच शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्याला खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आताच्या गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे अशा घटनांमधून दिसू लागले आहे.
Web Summary : A 17-year-old was murdered in Pune due to a past dispute. Three individuals attacked him with a sickle on Bajirao Road, also injuring his friend. Police are investigating the incident, which occurred in broad daylight, causing panic in the area.
Web Summary : पुणे में पुराने विवाद के चलते 17 वर्षीय युवक की हत्या कर दी गई। तीन लोगों ने बाजीराव रोड पर उस पर हंसिये से हमला किया, जिससे उसका दोस्त भी घायल हो गया। पुलिस मामले की जांच कर रही है, जो दिनदहाड़े हुई, जिससे इलाके में दहशत फैल गई।