2 days remaining for voter registration | मतदार नोंदणीसाठी उरले २ दिवस
मतदार नोंदणीसाठी उरले २ दिवस

ठळक मुद्देविधानसभा सार्वत्रिक निवडणूक : विभागीय आयुक्तांती दिली तयारीची माहिती

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ कोटी ९० लाख ९४ हजार १५९ मतदार आहेत. त्यात ९९ लाख २ हजार ६७७ पुरुष मतदार आणि  ९१ लाख ९० हजार ९९० स्त्री मतदार आहेत. तर ४९२ तृतीयपंथी मतदार आहेत. लोकशाहीच्या बळकटीसाठी सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. त्याचप्रमाणे येत्या २४ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करणाऱ्या मतदारांचा समावेश विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये केला जाणार आहे.
पुणे विभागाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये ५८ विधानसभा मतदार संघांपैकी २१ मतदारसंघ पुणे जिल्ह्यात, सातारा व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ८, कोल्हापूर जिल्ह्यात १० तर सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील सात मतदारसंघ राखीव आहेत. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळच्या मतदार यादीची तुलना करता विधानसभेसाठी मतदारांची संख्या वाढली आहे. तसेच पुणे विभागात ९८.५१ टक्के मतदारांना फोटो ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशाच मतदारांना मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत ३ लाख ७८ हजार ८५६ मतदार 
वाढले आहेत.
........
जिल्हानिहाय मतदान केंदे्र 
 पुणे      ७ हजार ९२२ 
सातारा     २ हजार ९७८ 
सांगली     २ हजार ४३५
कोल्हापूर     ३ हजार ३४२ 
सोलापूर     ३ हजार ५२१
 
दिव्यांग मतदारांची संख्या वाढली 
पुणे विभागात एकूण १ लाख २८ हजार ५१८ दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आलेली असून लोकसभेशी तुलना करता त्यात ३४,२२६ ने वाढ झालेली आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मतदानासाठी प्रवृत्त करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्या-जाण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे नियोजन केले आहे.
........
पुरामुळे मतदान केंद्रे बाधित
सांगली व कोल्हापूर पूरग्रस्त बाधित भागातील मतदान केंद्रांचे काही ठिकाणी नुकसान झाले असून, ती नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ पुराने बाधित झालेली ४७, सांगली जिल्ह्यातील ४० पैकी पुराने बाधित झालेली ३७ मतदान केंद्रे आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात ३५ मतदान केंद्रांचा त्यात समावेश आहे. तसेच पुरामुळे बाधित झालेल्या सांगली जिल्ह्यातील ४ लाख ३५ हजार ४२२ व कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ६० मतदारांना दुबार मतदान ओळखपत्र देण्याचे नियोजन आहे, असेही म्हैसेकर म्हणाले.
.............
मतदान केंदे्र तळमजल्यावर केली स्थलांतरित 
 पुणे जिल्ह्यातील १ हजार ११ पहिल्या व दुसºया मजल्यावरील मतदान केंद्रांपैकी एकूण ८९० मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. त्यातील पक्क्या इमारतीत ४८० व तात्पुरत्या स्वरूपातील शेडमध्ये ४१० मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. तसेच केवळ १२१ मतदान केंद्रे पहिल्या व दुसºया मजल्यावर असून, त्यांना लिफ्टची सोय आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ७ व सोलापूर जिल्ह्यातील २ पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. 
..........

Web Title: 2 days remaining for voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.