घायवळ टोळीतील गुंडांकडून एकाच वेळी २ गुन्हे, जुन्या वादाच्या कारणावरून कोयत्याने मानेवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:29 IST2025-09-19T10:29:09+5:302025-09-19T10:29:44+5:30
वैभव साठेच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का... तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने हल्ला केला

घायवळ टोळीतील गुंडांकडून एकाच वेळी २ गुन्हे, जुन्या वादाच्या कारणावरून कोयत्याने मानेवर हल्ला
पुणे : नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कोथरूड भागात एका तरुणावर गाेळीबार करण्यात आल्याची घटना घडली. रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास साइड दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीनंतर गोळीबारात एक तरुण जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोथरूड पोलिस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या मुठेश्वर मित्रमंडळासमोर बुधवारी (दि. १७) रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी हा प्रकार घडला. याप्रकरणातील आरोपींनी त्यानंतर पुढच्या १० मिनिटांत आणखी एका इसमावर जुन्या वादाच्या कारणावरून मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराइतांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोळीबारामध्ये प्रकाश मधुकर धुमाळ (३६, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे, तर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात वैभव तुकाराम साठे (१९, रा. श्रीकृष्णनगर, सागर कॉलनी, कोथरूड) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघांच्या फिर्यादीवरून मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक ऊर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर ऊर्फ अंड्या, दिनेश फाटक व अन्य सहकारी यांच्या विरोधात विविध कलमांसह आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हे मित्रांबरोबर मुठेश्वर मित्रमंडळासमोर रस्त्यावर गप्पा मारत उभे होते. दुचाकीवरून घायवळ टोळीतील गुंड तेथे आले. गाडीला साईड दिली नाही, म्हणून त्यांच्यात वाद झाले. त्यातून त्यांच्यातील मयूर कुंभारे याने त्याच्याकडील पिस्टलमधून गोळीबार केला. ही गोळी प्रकाश धुमाळ याच्या मांडीला लागली. गोळी लागून जखमी झालेले धुमाळ तेथून पळत पाठीमागे असलेल्या घरासमोरील पाण्याच्या टाकीआड लपून बसले. त्यानंतर हे गुंड तेथून पळून गेले.
दोन्ही तक्रारीत काय म्हटले...
धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी ‘तुला लय माज आला आहे का? इथे कशाला थांबला आहे. हा आमचा एरिया आहे, असे म्हणत रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून बघरे, यांना यांची आज विकेटच टाकू’ असे म्हणत गोळीबार केला. तेथून पुढे १० मिनिटांनी आरोपींना वैभव साठे हा त्याचे मित्र सुनील हरळय्या आणि यश गोडावत यांच्यासोबत सागर कॉलनी येथील एका घरासमोर बसलेला दिसला. मयूर कुंबरे आणि सुनील हरळय्या यांच्यातील जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सुनील याला शिवीगाळ करीत ‘याला मारून टाका, सोडू नका’ असे म्हटल्याने हरळय्या तेथून पळून गेला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी आपला मोर्चा वैभव साठे याच्याकडे वळवत ‘त्याच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का... तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने वैभव साठेवर हल्ला केला’, असे म्हटले आहे.
आरोपी नीलेश घायवळ टोळीतील सराईत...
रोहित आखाडे, गणेश राऊत, मयूर कुंबरे हे काेथरूडमधील नीलेश घायवळ टोळीतील सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी धुमाळ याच्यावर पिस्टलमधून तीन गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धावाधाव...
घटनेनंतर परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोथरूड भागात गजानन ऊर्फ गज्या मारणे आणि नीलेश घायवळ टोळीची दहशत आहे. या दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. कोथरूड भागात शिवजयंतीच्या दिवशी एका संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली होती. घायवळ याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. घायवळ याला न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोथरूड भागात शांतता होती. त्यानंतर बुधवारी रात्री घायवळ टोळीतील सराइतांनी गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रकाश धुमाळ हे खेड-शिवापूर येथे पार्टी करण्यासाठी त्यांच्या मित्रांसह गेले होते. एका मित्राला सोडण्यासाठी ते या परिसरात आले असता गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून गुंड तेथे आले. त्यांच्यातील एकाने धुमाळ यांच्यावर गोळीबार केला. गोळी प्रकाश धुमाळ याच्या मांडीला लागली. प्रकाश धुमाळ याची प्रकृती स्थिर असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. - संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३