पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा प्रवास सुखकर आणि आनंददायी मानला जातो. मात्र, मागील आर्थिक वर्षात पुणे एसटी विभागात विविध ठिकाणी अपघाताच्या १८८ घटना घडल्या असून, यामध्ये २१ जणांचा मृत्यू, ८४ गंभीर आणि ८३ जण किरकोळ जखमी झाल्याची नोंद पुणे एसटी विभागात झाली आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
गावखेड्यापासून महानगरापर्यंत दररोज लाखो प्रवाशांना पोहोचविणाऱ्या लालपरीचा प्रवास सुखकर समजला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांच्या अपघातात वाढ झाली आहे. पुणे विभागात १४ आगार असून, यामध्ये ८००पेक्षा जास्त बसमधून प्रवासी सेवा देण्यात येते. पुण्यातून राज्य आणि राज्याबाहेर एसटीची प्रवासी सेवा आहे. त्यामुळे एसटीला कायम गर्दी असते. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून महिला, ज्येष्ठांना प्रवासात सवलत देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. परंतु, वर्षभरात १८८ अपघात झाले, तरी याचे खूप कमी प्रमाण आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
देखभाल, दुरुस्तीवर भर
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मार्गावर बस सोडताना देखभाल, दुरुस्तीवर भर देण्यात येत आहे. वर्षभरात झालेल्या १८८ अपघातात केवळ २१ प्राणांतिक अपघात झाले आहेत. याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. शिवाय गंभीर आणि किरकोळ अपघाताचे प्रमाण कमी होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बस जुन्या झाल्या तरी मार्गावर सोडताना बसची देखभाल, दुरुस्ती करूनच मार्गावर सोडण्यात येत आहेत.
अशी आहे अपघाताची आकडेवारी
अपघात -- संख्याप्राणांतिक -- २१गंभीर -- ८४किरकोळ -- ८३एकूण -- १८८
महामंडळाने दिलेली मदत
- वैद्यकीय मदत - ९८,५०० रुपये- अपघात विमा मदत - ७,८४,३४,१७१ रुपये