आतापर्यंत १८३ परतले; शुक्रवारी काश्मीरमधील २३२ पर्यटक महाराष्ट्रात येणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:03 IST2025-04-24T20:02:53+5:302025-04-24T20:03:41+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रवाशांना परतण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली असून, राज्य सरकार या विमानांचा खर्च करणार

183 have returned so far 232 tourists from Kashmir will arrive in Maharashtra on Friday informed Muralidhar Mohol | आतापर्यंत १८३ परतले; शुक्रवारी काश्मीरमधील २३२ पर्यटक महाराष्ट्रात येणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

आतापर्यंत १८३ परतले; शुक्रवारी काश्मीरमधील २३२ पर्यटक महाराष्ट्रात येणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेत असून, शुक्रवारी २३२ प्रवाशांसाठी विशेष विमानाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. इंडिगो कंपनीचे हे विमान शुक्रवारी दुपारी श्रीनगरवरून महाराष्ट्राकडे झेपावणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या ४८ तासांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून, विशेष विमानांची व्यवस्था करत आहे. गुरुवारी मोहोळ यांच्या प्रयत्नातून १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले असून, शुक्रवारी २३२ प्रवासी महाराष्ट्राकडे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रवाशांना परतण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली असून, राज्य सरकार या विमानांचा खर्च करणार आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना आणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून, जम्मू ते श्रीनगर हा रस्ता बंद असल्याने काही पर्यटक जम्मू येथे अडकलेले आहेत. शिवाय रेल्वेने गेलेल्या प्रवाशांनाही रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा फटका बसला असून, महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना श्रीनगरमार्गे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे अजूनही जम्मू-काश्मीरच्या विविध भागातून फोन कॉल्स येत असून त्यांची व्यवस्था केली जात आहे.

अन् मंत्री मोहोळ मात्र वॉररूममध्येच !

केंद्रीय मंत्री मोहोळ यांची पुतणी अश्विनी हिचा शुक्रवारी विवाह असून, गेले काही दिवसांपासून मोहोळ कुटुंबियांकडून याची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, असे असले तरी गेल्या तीन दिवसांपासून मोहोळ स्वतः वॉररूममध्येच व्यस्त आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांचे येणारे फोन, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क आणि आवश्यक ती मदत करणे यातच मोहोळ स्वतः व्यस्त आहेत. त्यामुळे एकीकडे मोहोळ कुटुंब 'लग्नघर' असताना स्वतः मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना काश्मीरमधून परत आणण्याच्या 'मिशन' वरच असल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: 183 have returned so far 232 tourists from Kashmir will arrive in Maharashtra on Friday informed Muralidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.