वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ आरोपींविरुद्ध १७०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर

By नम्रता फडणीस | Updated: February 14, 2025 20:31 IST2025-02-14T20:31:19+5:302025-02-14T20:31:42+5:30

३९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या असून या २१ आरोपींची मालमत्ता जप्त होणार आहे

1700-page chargesheet submitted against 21 accused in Vanraj Andekar murder case | वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ आरोपींविरुद्ध १७०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर

वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ आरोपींविरुद्ध १७०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर

पुणे : कौटुंबिक वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात गुन्हे शाखेने २१ आरोपींविरुद्ध न्यायालयात तब्बल १७०० पानी दोषारोपपत्र शुक्रवारी ( दि.14) विशेष न्यायाधीश ( मोक्का) व्ही .आर कचरे यांच्या न्यायालयात दाखल केले. यात तब्बल ३९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या असून, नाना पेठ घटनास्थळावरील, आंबेगाव पठार, दापोली (रत्नागिरी) या तीन ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज, आरोपीची ओळख परेड, आरोपींचे पूर्वीचे गुन्हे रेकॉर्ड आणि आरोपींचे मोबाईलवरुन एकमेकांशी झालेल्या संपर्काबाबत तांत्रिक विश्लेषण आदी विविध महत्वपूर्ण मुददे नमूद करण्यात आले आहेत. या आरोपींची मोक्का अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

यापूर्वी आंदेकर खून प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी जवळपास तीनदा मुदतवाढ मिळाली. ही मुदत पूर्ण होण्याआधीच त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

संजीवनी कोमकर यांचे नाना पेठेत जनरल स्टोअर्सच्या दुकानावर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरुन केल्याचा संशय होता. तसेच संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर कुटुंबियाचे वनराज आंदेकर याचे कुटुंबियाबरोबर मालमत्तेवरुन वाद चालू होते. त्याचा कोमकर यांना राग होता. २०२३ मध्ये आंदेकर टोळीत कृष्णा आंदेकर व इतरांनी टोळी प्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड याचे टोळीतील सदस्य निखिल आखाडे याचा खून केला होता. या दोन्ही कारणावरुन टोळीप्रमुख सोमनाथ गायकवाड, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर यांनी इतरांसह कट रचला. १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता वनराज आंदेकर याच्यावर आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम, समीर काळे यांनी गोळीबार करुन त्याचा खून केला. या गुन्ह्यात वापरलेले ७ पिस्टल, १३ जिवंत काडतुसे, ७ कोयते जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या ७ दुचाकी व ३ चारचाकी वाहने जप्त केली. या गुन्ह्यात एकूण ३९ साक्षीदार तपासण्यात आहे. एकूण २१ आरोपींना अटक केली असून, दोन अल्पवयीन ताब्यात आहेत.

संघटीत गुन्हेगारी टोळीचे स्थावर व जंगम मालमत्तेबाबतची कायदेशीर कार्यवाही, गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र पुरवठा करणारे परराज्यातील आरोपींबाबत तपास करुन कार्यवाही, आरोपींना गुन्हा करण्यास मदत करणारे याबाबत तपास करुन पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची तरतुद ठेवण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस हवालदार विनोद शिंदे, अण्णा माने यांनी केली आहे.

Web Title: 1700-page chargesheet submitted against 21 accused in Vanraj Andekar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.