सोळा वर्षे फरार महिला 'मॉर्निंग वॉक’ ला बाहेर पडली अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:41 IST2021-08-03T18:41:26+5:302021-08-03T18:41:34+5:30
परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ’ती’ लोकांची फसवणूक करायची. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती

सोळा वर्षे फरार महिला 'मॉर्निंग वॉक’ ला बाहेर पडली अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडली
पुणे : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ’ती’ लोकांची फसवणूक करायची. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली. विमाननगर भागात नाव बदलून ती राहात होती. दररोज सकाळी फिरायला जाण्याची सवयच ’ती’ ला महागात पडली आणि अखेर ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. तब्बल सोळा वर्षे फरार असलेल्या महिलेला गुन्हे शाखेने अटक केली.
राहत तालीबअली सय्यद उर्फ अलका भगवानदास शर्मा (वय ५४, रा. आनंदयोग सोसायटी, विमाननगर,) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. २००५ मध्ये परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी अबिदअली मसुदअली सैय्यद, अब्दुलवहाब महमंदहनीफ मुजावर, राहत सैय्यद यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत ज्ञानेश्वर जमदाडे यांनी फिर्याद दिली होती. परदेशात नोकरीच्या आमिषाने जमदाडे, त्यांचे मित्र सुरेश रक्ती, प्रज्ञावंत करमरकर यांच्यासह अनेकांची फसवणूक करण्यात आली होती.
नाव बदलून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्य
त्यानंतर राहत सय्यद तिचे नाव बदलून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्य करत होती. ती विमाननगर भागात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. सय्यद दररोज सकाळी फिरायला जायची. पोलिसांनी तिला संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीत तिने फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली.