आर्थिक वादातून १४ वर्षीय मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार; मुलगा गंभीर जखमी, दाम्पत्य गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 14:57 IST2025-09-24T14:57:32+5:302025-09-24T14:57:32+5:30
मुलाच्या आईला मारहाण केल्यावर त्याने मध्यस्थी केली असता तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले

आर्थिक वादातून १४ वर्षीय मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार; मुलगा गंभीर जखमी, दाम्पत्य गजाआड
पुणे : आर्थिक वादातून १४ वर्षीय मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक केली. फरहान उमर शेख (१४) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शाहरुख मोहमंदीन फिरोज खान आणि मरियम शाहरुख खान (दोघे रा. हुमेरा मंजिल, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली. याबाबत फरहानची आई मासूम उमर शेख (३५, रा. विजय पार्क, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फराहानचे वडील उमर यांचे आरोपी शाहरूख याच्याशी आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. सोमवारी (दि. २२) रात्री पावणे दहाच्या सुमारास आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम हे उमर यांच्या घरी आले. त्यावेळी उमर घरात नव्हते. त्यांनी उमर यांना शिवीगाळ केली, तसेच मुलगा फरहान यालाही शिवीगाळ केली. त्यावेळी फरहानची आई मासूम यांनी मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी मासूम यांना धक्काबुक्की केली. आईला मारहाण केल्यानंतर फरहान चिडला. त्याने आरोपींना शिवीगाळ केली.
आरोपींनी फरहानला शिवीगाळ करुन त्याच्या छातीवर शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी शाहरूख आणि त्याची पत्नी मरियम यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.