५० ची क्षमता असणाऱ्या रेस्क्यू सेंटरमध्ये १३० बिबटे; वनविभागही त्रस्त, कर्मचाऱ्यांवर येतोय ताण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:39 IST2025-12-19T18:39:16+5:302025-12-19T18:39:51+5:30
ग्रामीणनंतर आता शहरी रहिवासी भागातही बिबट्यांची दहशत पसरत असून वनविभाग प्रभावी योजना आखून बिबटे जेरबंद करत आहे

५० ची क्षमता असणाऱ्या रेस्क्यू सेंटरमध्ये १३० बिबटे; वनविभागही त्रस्त, कर्मचाऱ्यांवर येतोय ताण
पुणे: अलीकडे शहरात वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करणारा वनविभागही आता त्रस्त झाला आहे. माणिकडोह येथे फक्त ५० बिबट्यांची क्षमता असणाऱ्या राज्यातील एकमेव रेस्क्यू सेंटरमध्ये तब्बल १३० बिबट्यांची संख्या पोहोचली आहे. या बिबट्यांचे पालनपोषण, सुरक्षा व उपचारांचा ताण वन कर्मचाऱ्यांवर येत आहे. यावर उपायासाठी वनविभाग केंद्र सरकारच्या माध्यमातून देशा-विदेशातील सरकारांसह प्राणी संग्रहालयांशी संपर्कात आहे. संमती मिळाली तर येथील काही बिबटे भेट म्हणून पाठवणे शक्य आहे. वनतारा खासगी प्रकल्पालातही बिबटे पाठवणीचा वनविभागाचा प्रयत्न आहे.
ग्रामीणनंतर आता शहरी रहिवासी भागातही बिबट्यांची दहशत पसरत आहे. त्यामुळेच वनविभाग प्रभावी योजना आखून बिबटे जेरबंद करत आहे. माणिकडोह बिबटे रेस्क्यू सेंटरमध्ये नागपूर (गोरेवाडा), राहुरीसह अन्य भागात पकडलेले बिबटे आणले जातात, मात्र ही प्राथमिक उपचार केंद्र असल्याने उपचारानंतर बिबटे लगेच माणिकडोह सेंटरमध्येच आणले जातात. त्यामुळेच या सेंटरमधील बिबट्यांची संख्या क्षमतेबाहेर गेली आहे.
आक्रमक बिबटे ठेवलेल्या पिंजऱ्यांच्या गजांवर धडका मारून जखमी होतात. त्यांच्यावर उपचार केले नाहीत तर जखमा चिघळून बिबट्या दगावण्याचा धोका असतो. आठवड्याचे ६ दिवस दररोज एकवेळ किमान २ किलो मांसाहार द्यावे लागते. कर्मचारी धोका पत्करून ही कामे करतात.
सेंटरमधील बिबट्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक दाखल बिबट्याची काळजी घेतली जात आहे. त्यांचे प्राणी संग्रहालयात स्थलांतरासाठी मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी वरिष्ठ कार्यालय केंद्राच्या माध्यमातून विदेशी सरकारे, प्राणी संग्रहालयांशी संपर्कात आहे.- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग