राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती; इथेनॉल निर्मितीतही आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:22 IST2021-05-27T18:22:07+5:302021-05-27T18:22:40+5:30
राज्यात यंदा १०१२ लाख टन ऊसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता.

राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती; इथेनॉल निर्मितीतही आघाडीवर
पुणे: राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी१४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर तयार केली. इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे १०८ कोटी लिटरचे ऊद्दीष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे.
इथेनॉल विक्रीतून रक्कम रोख मिळाल्याने कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या ऊसाची रास्त किफायतशीर किंमत (एफ आर पी) देणे शक्य झाले. एकूण ९३ टक्के एफआरपी दिली गेली. १९ कारखान्यांवर सुमारे ४५० कोटी रूपयांची थकबाकी दिली नाही म्हणून जप्तीची कारवाई झाली. आणखी १० कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकाही ऊस ऊत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी साखर आयुक्त कार्यालय दक्ष राहणार आहे असे साखर आयूक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
इथेनॉल निर्मितीमुळे उतारा कमी झाला. मात्र त्याची किंमत जमेस धरली जाणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही असे गायकवाड म्हणाले.
राज्यात यंदा १०१२ लाख टन ऊसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला. आजमितीस राज्यात कुठेही गाळपासाठी ऊस शिल्लक नाही.सर्वाधिक म्हणजे १८.८८ लाख टन गाळप हातकणंगले ( ता. हुपरी) येथील जवाहर कारखान्याने केले. सर्वाधिक एफआरपी ५२८ कोटी रूपये त्यांनीच दिली. त्यांच्याकडून २२लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. अर्थ विभागाचे संचालक ज्ञानदेव मुकणे तसेच ऊपपदार्थचे सहसंचालक संजय भोसले, पांडुरंग शेळके (विकास), ऊत्तम इंदलकर (प्रशासन), राजेश सुरवसे (प्रशासन) यावेळी उपस्थित होते.
कोरोना काळात सामाजिक जबाबदारी धाराशिव कारखान्यांबरोबरच आता आणखी १९ कारखाने ऑक्सिजन निर्मिती करणार आहेत. काही कारखाने लगेच सुरू होणारा ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित करत असून त्याचे पैसेही त्यांनी जमा केले आहेत असे गायकवाड यांनी सांगितले.