शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

Monsoon Coming In India: देशात १०३ टक्के मान्सून बरसणार; दोन ते तीन दिवसांत कोकणात धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 20:29 IST

महाराष्ट्रातील जळगाव तर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजानुसार हिंदी महासागरातील ला निनाचा परिणाम संपूर्ण मान्सून काळ राहणार असल्याने देशात आता सरासरीच्या १०३ टक्के मान्सून बरसणार असल्याचा अंदाज आहे. पहिल्या टप्प्याच्या अंदाजानुसार मान्सून ९९ टक्के पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जून महिन्यात सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात दक्षिण कोकण व गोवा, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील जळगाव तर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने मान्सूनचा दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजासह जून महिन्यातील पावसाची स्थिती कशी राहील याचाही अंदाज व्यक्त केला. पावसाचा वाढीव अंदाजाला हिंदी महासागर व प्रशांत महासागरात तयार झालेली ला निनाची स्थिती कारणीभूत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्याच्या अंदाजानुसार ला निनाची स्थिती ऑगस्टच्या अखेरीस संपण्याचा अंदाज होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील अंदाजानुसार ही स्थिती संपूूर्ण मान्सून काळात कायम राहणार आहे. त्यामुळे पाऊस जास्त पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. याच काळात हिंद महासागरातील द्विध्रृवीय स्थिती ऋणभारीत असली तरी त्याचा फारसा परिणाम ला निनावर होणार नसल्याने मान्सूनवर सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच या टप्प्यातील अंदाजात पाऊस सरासरीच्या १०३ टक्के राहील अशी शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ला निनाचा असा होतो परिणाम

हिंद व प्रशांत महासागरात ला निनाची स्थिती असल्यास मान्सून चांगला बरसण्याची शक्यता असते. तर अल निनो असल्यास मान्सूनवर विपरित परिणाम होऊन पाऊस कमी पडतो. त्यातही ला निना असताना हिंद महासागरात ऋणभारीत द्विध्रृवीय स्थिती असल्यास मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असते.

मध्य भारतात चांगला पाऊस

याच अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या काळात मान्सून दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १०३ टक्के पडण्याची शक्यता असून त्यात ४ टक्क्यांचा फरक राहू शकतो. देशात १९७१ ते २०२० या काळातील दीर्घ कालावधीची सरासरी ८७० मिमी आहे. देशाच्या चार विभागांसाठी ही मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला असून मध्य व दक्षिण किनारपट्टीत मान्सून सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के, ईशान्य भारत व उत्तर पश्चिम (वायव्य) भारतात पाऊस सरासरी इतका (९६ ते १०६ टक्के) पडण्याची शक्यता आहे. मान्सूनचा मुख्य प्रदेश समजल्या जाणाऱ्या मध्य भारतात, जेथे शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे, तेथे पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. त्यात राज्याचा काही भाग येतो. त्यामुळे शेतकर-यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही महापात्रा यांनी आश्वस्त केले.

जूनचा पहिला पंधरवडा कमी पावसाचा

जून महिन्याचा अंदाज व्यक्त करताना, हवामान विभागाने दीर्घ कालावधीच्या सरासरी इतका (९२ ते १०८ टक्के) पाऊस राहण्याची शक्यता आहे. १९७१ ते २०२० या काळातील सरासरीनुसार देशात जूनमध्ये १६५.४ मिमी पाऊस पडतो. अंदाजानुसार जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, त्यानंतरच्या पंधरवड्यात वाढेल. केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, तमिळनाडू, व महाराष्ट्रातील दक्षिण कोकण म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोवा व मुंबई, मध्य महाराष्ट्राचा जळगाव, पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जून महिन्यात देशात कमाल तापमान हे उत्तर पश्चिम भारत वगळता इतरत्र सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमानाची तीच स्थिती राहू शकेल.

ईशान्येत ट्रेंड बदलतोय

गेल्या काही वर्षांत ईशान्य भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचे नेमके कारण शोधण्यासाठी विशिष्ट माहितीच्या पृथ्थकरणाची गरज असल्याचे महापात्रा यांनी सांगितले. सिक्कीम, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेशात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांत तो सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज आहे. यावरून यंदा ट्रेंड बदलू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दशकांचा अभ्यास करता, देशात सरासरीच्या कमी पाऊस व सरासरीपेक्षा जास्त पाऊस अशी स्थिती असते. देशातील कमी पावसाचे दशक संपत असून, ते आता सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या दशकाकडे वाटचाल सुरू असल्याचे महापात्रा यांनी सांगितले.

२ ते ३ दिवसांत मान्सून कोकणात धडकणार

मान्सून प्रवासाला अनुकूल स्थिती असून, येत्या दोन ते तीन दिवसांत त्याचा प्रवास आता मध्य अरबी समुद्र, कर्नाटकाचा मोठा भाग, कोकण व गोव्याचा काही भाग, तमिळनाडूचा भाग, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, ईशान्येकडील राज्यात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसWaterपाणीIndiaभारतDamधरण