'...पण आम्ही त्यांना कधीच चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 14:59 IST2021-07-11T14:55:17+5:302021-07-11T14:59:03+5:30
congress leader nana patole on chandrkant patil: देशातील नागरिकांचे भले होणार असेल तर आमच्यावर केलेल्या टीकेचे स्वागत

'...पण आम्ही त्यांना कधीच चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही'
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला काहीही म्हटले तरी चालेल. पण आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही, असे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपचे नेते सत्ता गेल्यामुळे सैरभेर झालेल्याचे म्हटले.
नाना पुढे म्हणाले, केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे राज्यातील भाजप नेत्यांचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यांनी आम्हाला कितीही हिणवले तरी आमची हरकत नाही, त्यांनी आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असे, तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील आणि केंद्र सरकारने जाणिवपूर्वक कोर्टाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
मोदी सरकारकडे ठोस धोरण नाही
ते पुढे म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली. गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारकडे काही ठोस धोरण नाही. गंगेच्यापात्रातून वाहणारे हजारो मृतदेह जगभरातील माध्यमांनी दाखवल्यामुळे मोदी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचा घणाघातही त्यांनी केला. तसेच, मोदी सरकारने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री बदलून मोदींनी आपल्या अपयशाची कबुलीच दिल्याचेही पटोले म्हणाले.