'आपल्याला आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही', देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 08:55 PM2021-01-28T20:55:51+5:302021-01-28T20:56:38+5:30

Devendra Fadnavis : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावे लागेल, असे म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली.

"We don't want to be in the opposition for long now," said Devendra Fadnavis | 'आपल्याला आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही', देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

'आपल्याला आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही', देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Next
ठळक मुद्देविधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे 'वर्षभराचा लेखाजोखा' नावाच्या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन झाले.

मुंबई : आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचे नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहोत, तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे 'वर्षभराचा लेखाजोखा' नावाच्या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन झाले. यावेळी  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना संकट, मेट्रो कारशेडसह इतर मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने आरे येथे कारशेडसाठी जागा निश्चित केली होती. मात्र, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर कारशेडची ही जागा रद्द करुन इतरत्र हालवण्याचे प्रयत्न झाले. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावे लागेल, असे म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी नुकतेच दिल्लीहून एअरपोर्टला जाण्यासाठी मेट्रोमध्ये बसलो तेव्हा मला एक तास लागला. त्याचवेळी माझ्या लक्षात आले की, कुलाब्यावरुन मुंबई विमानतळावर जाण्यासाठी आपल्याला २०२१ मध्ये केवळ २५ मिनिटे लागतील. आता २०२१ साल आले ८० टक्के काम झाले होते, उरलेले काम थांबले आहे. मग माझ्या लक्षात आले की पुढील दोन तीन वर्षे काम होऊ शकत नाही. कारण जर मुंबई विमानतळावर कुलाब्यातून किंवा मुंबईतील कुठल्याही भागातून लोकल किंवा मेट्रो-३ मधून जायचे असेल तर आरेमध्येच कारशेड करावे लागेल. पण काही लोकांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला त्यामुळे पुढील चार वर्षे मुंबईकरांना मेट्रो-३ मध्ये बसता येणार नाही. मुंबईकरांना मेट्रो-३ किंवा अंडरग्राउंड मेट्रोचे जर फोटो काढायचे असतील तर दिल्ली किंवा कोलकात्यालाच जाऊन फोटो काढावे लागतील आपल्याला मुंबईत तशी संधी मिळेल असे आम्हाला वाटत नाही."

याचबरोबर, 'आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये', या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य करणे हेच आमचे यश आहे. पण केवळ विदर्भाचे रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. याशिवाय, धारावी पॅटर्नवरुनही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, "राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना, अनेक जण मृत्यमुखी पडत असताना काही लोक वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचे दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केले."

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपाच मोठा पक्ष ठरला हे जनतेने दाखवून दिले. त्यामुळे यापुढेही आपल्याला मोठे काम करावे लागेल. जेवढा वेळ विरोधी पक्षात राहू सत्तेचा विचार डोक्यात आणायचा नाही. पूर्ण न्याय देत शेवटच्या माणसाचा आवाज बनून काम करु, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

Web Title: "We don't want to be in the opposition for long now," said Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.